मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोवरचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. गोवर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात गोवरचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी संशयित गोवर रुग्णांची संख्या १० हजार ५४४ वर पोहोचली आहे. तर गोवरची लागण झालेल्यांची संख्या ६५८ वर पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षांपासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे संपूर्ण देशभरात पहिल्यांदा लॉकडाऊन लागलं होतं. तसेच कोरोनाची लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले होते. वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं ही पावलं उचलली होती. सध्या राज्याच गोवरच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सनं लागण झालेल्यांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत.
गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी विलगीकरणात ठेवावं, असे निर्देश टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. यासाठी रुग्णालयीन व्यवस्था करण्याचे निर्देही टास्क फोर्सनं दिले आहेत. त्याचप्रमाणे कुपोषित बालकांना गोवर आजाराची लागण झाली असेल, तर त्यांची अधिक काळजी घेणं आवश्यक असतं. अन्यथा त्यांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्व ‘अ’ डोस द्यावा, असे निर्देशही टास्क फोर्सनं प्रशासनाला दिले आहेत.
गोवर रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबईत उद्रेक झालेल्या गोवर रुग्णांच्या संख्येने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर औरंगाबाद शहरात गोवर संशयित आढळून आल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. ग्रामीण भागातील लसीकरण न झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी आणि लसीकरण करण्यासाठी सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली आहे.
ही आहेत गोवर संसर्गाची लक्षणे
तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे गोवरमध्ये आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. या आजारामुळे मुलं दगावण्याचीदेखील भीती आहे.
Govar Disease Task Force New Guidelines