इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील गोरखनाथ मंदिरात तैनात दोन पीएसी जवानांवर धारदार हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी आरोपी अहमद मुर्तजा अब्बासीचे प्रकरण प्रशासनाने दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) हस्तांतरित केले आहे. प्रकरण हस्तांतरित केल्यानंतर मुर्तजासह त्याच्या वस्तू एटीएसकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. एटीएसकडून त्याची चौकशी करण्यात आली असून, पथकाने मुर्तजाच्या मुंबईतील दोन ठिकाणांवरून माहिती गोळा केली आहे.
एटीएसने मुर्तजाच्या गोरखपूरच्या सिव्हिल लाइन्स येथील घरातून एकाला ताब्यात घेतले आहे. परंतु अधिकृतरित्या याला दुजोरा मिळाला नाही. पोलिसांनी त्याच्या घराच्या एका भागाला कुलूप लावून दुसरा भाग त्याच्या कुटुंबाला राहण्यासाठी दिला आहे. मुर्तजाची वैद्यकीय तपासणी रात्री करण्यात आली. त्यानंतर त्याला घेऊन पथक लखनऊला रवाना झाले.
मंदिरात प्रवेश करणाऱ्या, दहशतवादी कट रचणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या मुर्तजाच्या हेतूचा तपास करण्यासाठी एटीएस, पोलिस, एसटीएफ आणि गुप्तचर यंत्रणेचे जवळपास एक डझन पथकांचे काम सुरू आहे. नेपाळ, मुंबई, कोईम्बतूर, जामनगर, गाजीपूर आणि जौनपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पथकांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे.
गोरखनाथ मंदिराच्या दक्षिण दरवाज्यावर पीएसी जवान गोपाल गौड, अनिल पासवान यांच्यावर मुर्तजाने रविवारी सायंकाळी हल्ला केला होता. मुर्तजाला सात दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. मुर्तजाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंच्या तपासातून त्याचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
दहशतवादी संघटनांशी लिंक असल्याचा शोध घेताना त्याने कोणा-कोणाशी किती आर्थिक व्यवहार केला आहे हे तपासण्यासाठी मुर्तजाचे बँक खाते तपासले जात आहेत. एका पथकाने गाझीपूर येथील त्याच्या माजी पत्नी आणि सासऱ्यांची चौकशी केली आहे. घटस्फोटानंतर शादमा दोन वर्षांपासून वेगळी राहात आहे असे कुटुंबीयांनी सांगितले. मुर्तजाशी तिचा काहीच संबंध नाही.
सिव्हिल लाइन्स येथील रहिवासी मुनीर अब्बासी यांचा मुलगा मुर्तजा याची कृत्ये दहशतवादी कटाचा भाग मानून प्रशासनाने एटीएस आणि एसटीएफकडे तपास सोपोवला आहे. यूपी एटीएससह देशभरातील सर्व गुप्तचर यंत्रणा त्याच्याबद्दल तपास करत आहेत. गुजरात एटीएसचे एक पथक गोरखपूरमध्ये आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक जुना लॅपटॉप जप्त केला आहे. या लॅपटॉपमध्ये दहशतवादी कृत्यांचा तपशील मिळाला आहे. यामध्ये गनिमी काव्यावरील एक व्हिडिओही मिळाला आहे.