मुंबई – गुगलसोबत आपले आयुष्य आता एकरुप झालेले आहे. एकवेळ घरच्या लोकांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवणार नाही, पण गुगलवर आपला विश्वास आहे. गुगल जे काही सांगेल ते खरेच सांगेल, असा आपला आता ठाम विश्वास बसायला लागला आहे. मात्र गुगल चोरून तुमचा विश्वासघात करतोय का, हे एकदा तपासायला हवे. गुगल तुमचे बोलणे रेकॉर्ड करतोय का, तुमचा डेटा चोरून दुसरीकडे विकतोय का? या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.
जीमेल, युट्यूब, गुगल ड्राईव्ह, गुगल मॅप किंवा गुगल असिस्टन्ट यांच्या माध्यमातून आपण दररोज गुगलच्या संपर्कात असतोच असतो. त्यामुळे गुगल आपल्या दैनंदिनीवर नजर ठेवून असल्याची शंकाही सातत्याने व्यक्त होत असते. किंवा आपला डेटा चोरून जाहिरात कंपन्यांना विकत असल्याचा आरोप तर जगभरातून गुगलवर झाला आहे. पण गुगल असिस्टन्ट आपले बोलणे रेकॉर्ड करीत असते, हा मात्र गैरसमज आहे. मुळात जोपर्यंत गुगल असिस्टन्ट सुरू करीत नाही तोपर्यंत तो स्टॅंडबाय मोडवरच असतो. हे गुगल किंवा ओके गुगल म्हणत नाही, तोपर्यंत तो स्टँडबाय मोडवरच असतो. तुम्ही गुगल असिस्टन्टला हिस्ट्री डिलीट करायला सांगितली तर तो तेदेखील करतो. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
जाहिरातींची निवड कशी होते?
आपण गुगलवर ज्या पद्धतिचे सर्चिंग करतो त्यावर आधारित जाहिराती आपल्या जीमेलवर येतात. याचा अर्थ जीमेल किंवा गुगल ड्राईव्हवरील डेटा असुरक्षित आहे, असे होत नाही. हे केवळ सर्च इंजिनमधून आलेले असते. जाहिराती निवडण्याची व दाखविण्याची प्रक्रिया पूर्णपणे आटोमोडवर असते. त्यात तुम्हाला ज्या गोष्टी बघायला आवडतात, त्याच्याच जाहिराती दाखविल्या जातात.
मॅप धोकादायक नाही
एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण गुगल मॅपचा आधार घेतो. ज्या भागात आपल्याला जायचे आहे त्या भागातील ट्राफिकची स्थिती पण गुगल सांगतो. याचा अर्थ गुगल आपल्यावर नजर ठेवून आहे, असे नाही. कारण गुगल कुणाचीही ओळख जाहीर करीत नाही.