मुंबई – पूर्वी लोकांना एकमेकांचे लँडलाईन नंबर पीनकोडसह तोंडपाठ असायचे. मोबाईल आला आणि स्मरणशक्तीला ताण देण्याची पद्धत बाद झाली. पूर्वी लोक कुठलीही नवी माहिती एकमेकांशी बोलून, चार पुस्तके वाचून शोधायचे. गुगल आल्यानंतर बुद्धीला जोर देण्याची परंपरा नेस्तनाबूत झाली. आता आपण पूर्णपणे गुगलवर अवलंबून झालो आहोत आणि गुगल त्यातून मिनीटाला कोट्यवधी रुपये कमवत आहे. ही रक्कम किती आहे हे जाणून घ्याल तर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तर, आज जाणून घेऊ या गुगलच्या या कमाईबद्दल…
गुगल सर्चवर प्रत्येक मिनीटाला लाखो लोक काहीना काही सर्च करीत असतात. त्यातून गुगलच्या खात्यात दर मिनीटाला सरासरी तब्बल २ कोटी रुपये जमा होतात, हे ऐकून नवल वाटेल. पण सत्य आहे. २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत गुगलसाठी मोठी आवक झाली. आतापर्यंतचे सर्वाधिक ६१.९ अब्ज डॉलर गुगलने केवळ एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांमध्ये कमावले. त्यात सर्वांत मोठा हिस्सा अर्थात ३५.८ अब्ज डॉलर (भारतीय चलनात सांगायचे तर जवळपास २ लाख ६६ हजार ६९५ कोटी रुपये) सर्च इंजिनच्या माध्यमातून आले आहेत. यावरून दर मिनीटाला २ कोटी रुपये गुगलच्या खात्यात सर्च इंजिनच्या माध्यमातून जमा होतात, असे स्पष्ट होते.
विक्रमी नफा
अल्फाबेट कंपनीला गुगल सर्चनंतर सर्वाधिक कमाई युट्यूबच्या माध्यमातून होते. युट्यूबच्या माध्यमातून दुसऱ्या तिमाहीत जवळपास ३५.८ अब्ज डॉलर कमाई झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती तब्बल १४ अब्ज डॉलरने जास्त आहे.
दर मिनीटाला २ ट्रिलीयन सर्च
गुगलवर जगभरातून दर मिनीटाला २ ट्रिलीयन सर्च होतात. त्यामुळे गुगलला युट्यूबच्या तुलनेत जास्त जाहिराती मिळतात. २०१९ च्या आकडेवारीनुसार गुगलवर दर मिनीटाला ३.८ दशलक्ष गोष्टी सर्च केल्या जातात. दिवसाला ५.६ अब्ज आणि वर्षाला २ ट्रिलीयन सर्च केले जातात.