अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बिल भरण्यापासून ते तिकीट बुक करण्यापर्यंत, आजच्या काळआत आपण सर्व साधारणपणे यूपीआय अॅप, नेट बँकिंग वापरतो. किराणा दुकान असो, भाजीपाल्याची गाडी असो किंवा मोठा शॉपिंग मॉल, आजकाल ऑनलाइन पेमेंटची सुविधा सर्वत्र उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या पद्धतींद्वारे आपण पैसे इतरांना पाठवूही शकतो तसेच इतरांकडून मिळवूही शकतो. एकूणच, यामुळे आपले जीवन सोपे होते आणि वेळेची बचत देखील होते आहे.
एकीकडे डिजिटल पेमेंट पद्धती वाढत असताना सायबर गुन्ह्यांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. फसवणूक करणारे तुमचे पैसे चोरण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. भारतात गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. तुम्ही कोणतेही डिजिटल पेमेंट अॅप वापरत असाल (मग गुगल पे किंवा फोन पे किंवा पेटीएम असो), तर काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवण्याची गरज आहे. म्हणजे फसवणूक टाळता येईल आणि सुरक्षित पेमेंट देखील करता येईल.
यूपीआय पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा
१. तुमचे यूपीआय अॅप अपडेट ठेवा
सायबर गुन्हेगारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी यूपीआय अॅप वेळोवेळी अपडेट करत राहणे गरजेचे आहे. सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी, कंपन्या प्रत्येक अपडेटसह नवीन वैशिष्ट्ये देत असतात. अशा परिस्थितीत यूपीआय अॅप नेहमी अपडेट ठेवणे गरजेचे आहे.
२. पेमेंट प्राप्त करण्यासाठी कधीही पिन टाकू नका
कोणत्याही यूपीआय अॅपमध्ये, पैसे मिळवण्यासाठी वापरकर्त्याला त्याचा/तिचा पिन टाकण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, पैसे पाठवताना कोणी तुम्हाला तुमचा पिन टाकण्यास सांगत असल्यास सावधगिरी बाळगा.
३. फसवणूक करणाऱ्या कॉलपासून सावध रहा
सायबर गुन्हेगार लोकांना फक्त लिंक पाठवून पैसे चोरण्याचा प्रयत्न करत नाही तर ते वापरकर्त्यांना थेट कॉल करून त्यांचा पासवर्ड, पिन इत्यादी विचारतात. बँका कॉलवर असे तपशील कधीही विचारत नाहीत. त्यामुळे अशा कोणत्याही आवाहनाला बळी पडू नये.
४. कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नका आणि पिन टाकू नका
आजकाल लोकांना मेल आणि व्हॉट्सअॅपवर विशेषत: सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्स मिळतात. अशा लिंक्स तुम्हाला ‘गिफ्ट’ किंवा ‘कॅशबॅक’ प्राप्त करण्यासाठी तुमचा पिन आणि इतर तपशील प्रविष्ट करण्यास सांगतात. त्यामुळे अशा लिंक्सची काळजी घ्या आणि त्या उघडू नयेत.
5. स्ट्राँग पासवर्ड तयार करा
यूपीआय सेवेसाठी नोंदणी करताना स्ट्राँग पिन सेट करा. एक पिन तयार करा ज्याचा कोणीही सहज अंदाज लावू शकत नाही. यूपीआय पिनमध्ये सहसा चार किंवा सहा अंक असतात.