क्वालालंपूर (इंडोनेशिया) – गुगल मॅपवर जास्त अवलंबून राहिले तर धोका होऊ शकतो, याची प्रचिती देणारी एक घटना अलीकडेच इंडोनेशियात घडली. एका नवरदेवाला त्याचा फटका बसला आहे. नवरीच्या घरी जाण्यासाठी नवरदेवाने गुगल मॅपचा आधार घेतला आणि वरात घेऊन तो भलत्याच घरी पोहोचला. ही घटना केवळ एवढ्यावरच थांबली नाही.
ज्या चुकीच्या पत्त्यावर नवरदेव पोहोचला, तेथेही लग्नसोहळा होता. ते लोक देखील वरातीची वाट बघत होते. पण वेळेच्या आत चूक लक्षात आली आणि नवरदेवाच्या बाबतीत रॉंग नंबर लागण्यापासून नवरीकडचे लोक वाचले.
सेंट्रल जावा येथील लोसारी गावात नवरदेवाला जायचे होते. गुगल मॅप लावून तो निघाला. पण वरात घेऊन जेंगलोक येथे पोहोचला. योगायोगाने त्याठिकाणी मारिया अल्फा व बुरहान सिद्दिकी यांचे लग्न होणार होते. तिथे नवरदेवाची वाट बघणे सुरूच होते. मारियाच्या कुटुंबियांनी वरातीचे स्वागत केले. त्यांना नाश्ता दिला, एकमेकांना भेटवस्तू दिल्या. त्याचवेळी कुटुंबातील एकाला गडबड झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मारियाच्या कुटुंबियांची माफी मागितली व गुगल मॅपमुळे हे घडल्याचे सांगितले. त्यानंतर ते योग्य घराच्या दिशेने निघाले.
असे आले लक्षात
मारियाच्या घरातील एका सदस्याने बुरहान सिद्दिकीच्या परिवाराशी संपर्क साधून किती वेळ आहे याचा अंदाज घेतला. त्यावेळी ते लोक रस्त्यात कुठेतरी थांबले आहेत, उशीर होईल असे कळले. मात्र अवघ्या दुसऱ्याच मिनीटाला वरात दारामध्ये आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते.
सोशल मिडीयावर माहोल
हल्ली कुठलीही घटना सोशल मिडीयावर गाजणार नाहीत तरच नवल. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आला. यात संपूर्ण गोंधळ दाखविण्यात आला आहे. त्यामुळे बघणारा एन्जॉय करतो.