विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सध्याच्या परिस्थितीत भारतात कोविड रुग्णांची संख्या उच्चांकावर आहे. या परिस्थितीत सगळे जण आपापल्या परिने मदतीसाठी पुढे येत आहेत. संकटाच्या या काळात गुगलकडून काही अपडेट्सची घोषणा करण्यात आली आहे. गुगलच्या Google Map मध्ये नव्या महत्त्वाच्या फिचरची चाचणी सुरू करण्यात आली आहे.
Google Map द्वारे युजर्स रुग्णालयातील बेड आणि ऑक्सिजनच्या स्थितीची माहिती मिळवू शकणार आहेत. सोबतच वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा आणि स्थानाची माहितीही मिळवू शकणार आहेत. कोविडकाळात गुगलचे हे फिचर खूपच फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
गुगलतर्फे सुरुवातीला या नव्या फिचरची काही निवडक ठिकाणी चाचणी करण्यात येणार आहे. लवकरच जास्तीत जास्त ठिकाणांवर फिचर कार्यान्वित होणार आहे.
ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या ठिकाणी किंवा रुग्णालयात तुम्ही उपस्थित असाल, तेव्हा Google Map तुम्हाला ऑक्सिजन आणि बेडच्या उपलब्धतेबाबत विचारेल. युजरच्या प्रतिसादाच्या मदतीने इतर युजर्सना ऑक्सिजन आणि बेडच्या उपलब्धतेविषयी माहिती दिली जाईल.
रुग्णालये आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेची माहिती पुढे पाठविण्यापूर्वी युजर्सना खरी माहिती मिळण्यासाठी त्याची पडताळणी केली जाईल. ही माहिती युजरच्या फिडबॅकच्या आधारावर असेल. कोणत्याही चुकीच्या माहितीसाठी गुगल जबाबदार राहणार नाही, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.