इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकेतील महिला कामगारांना समान कामासाठी पुरुषांपेक्षा कमी पगार दिल्याच्या प्रकरणात गुगलला सुमारे ९२० कोटी रुपये मोजावे लागले आहेत. सुमारे १५ हजार ५०० महिला कामगारांना ही भरपाई मिळणार आहे. सप्टेंबर २०१३पासून गुगलच्या कॅलिफोर्निया कार्यालयात २३६ प्रकारच्या पदांवर महिला कर्मचारी कार्यरत आहेत. यानुसार, गुगलला प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला सरासरी ५.९३ लाख रुपये द्यावे लागतील.
गुगलने तीन वर्षांसाठी बाहेरील विश्लेषकांकडून कर्मचारी वेतन मूल्यांकन केले आहे. गुगलवर २०१७मध्ये तीन माजी महिला कर्मचार्यांनी खटला दाखल केला होता, नंतर आणखी काही कर्मचाऱ्यांनी गुगलच्या वेतनप्रणालीतील भेदभावावर आरोप केले होते. ते म्हणाले की गुगल पुरुष कर्मचाऱ्यांपेक्षा महिला कर्मचाऱ्यांना कमी पगार देते. यावर झालेला सामंजस्य करार आता सॅन फ्रान्सिस्को येथील वरिष्ठ न्यायालयाकडून प्रमाणित केला जाईल. मायक्रोसॉफ्ट आणि ओरॅकल या सॉफ्टवेअर कंपन्यांवरही अशाच प्रकारचे खटले दाखल करण्यात आले होते. ओरॅकलचा खटला शुक्रवारी फेटाळण्यात आला.
पाच वर्षे खटला सुरु राहिल्यानंतर गुगलचे प्रवक्ते ख्रिस पापास यांनी सांगितले की “हे प्रकरण मार्गी लवण्यात आम्हालाही आनंद आहे. कंपनीचा समानतेच्या धोरणांवर आमचा ठाम विश्वास आहे. हा करार सर्वांच्या हिताचा असल्याचे सांगून त्याला सहमती मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. भरपाईची रक्कम निश्चित करण्यासाठी, मागील ९ वर्षांच्या पगाराचे विश्लेषण करण्यात आले. ”
याचिकाकर्त्यांपैकी एक होली पीसने एका निवेदनात म्हटले आहे की, ”एक महिला म्हणून जिने आपले संपूर्ण करिअर टेक उद्योगाला वाहून घेतले आहे, तिला उद्योगातील इतर सर्व कामगारांप्रमाणे समान वागणूक मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषत: पगार, पदे आणि पदोन्नती यांमध्ये समानता असेल.”
google gender inequality discrimination court order compensation