नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्च इंजिन गुगलची मनमानी रोखण्यासाठी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) पुन्हा एकदा दंड ठोठावला आहे. गुगलला भारतीय स्पर्धा आयोगाने प्ले स्टोअर धोरणांमध्ये आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल ९३६.४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऑक्टोबर महिन्यात गुगलवर अशी कारवाई होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी सीसीआयने सुमारे १३३८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. अशाप्रकारे, गुगलला महिन्याभरात आतापर्यंत सुमारे २३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला नुकताच १३३७.७६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अँड्रॉइड मोबाईल डिव्हाइस विभागातील मजबूत बाजारातील स्थितीचा गैरवापर करण्यासाठी ही कारवाई केली गेली. याशिवाय, सीसीआयने आघाडीच्या इंटरनेट कंपनीला अनुचित व्यापार कृत्ये थांबवण्याचे आणि बंद करण्याचे निर्देश दिले होते. गुगलला निर्धारित वेळेत काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सीसीआयच्या पहिल्या कारवाईवर सर्च इंजिन गुगलचीही प्रतिक्रिया आली. कंपनीने म्हटले होते की, “सीसीआयचा निर्णय भारतीय ग्राहक आणि व्यवसायांसाठी एक मोठा धक्का आहे. यामुळे अँड्रॉईडच्या सुरक्षा वैशिष्ट्यांवर अवलंबून असलेल्या भारतीयांसाठी गंभीर सुरक्षा धोक्याची संधी आहे. या निर्णयामुळे भारतीयांच्या मोबाइल डिव्हाइसची किंमत वाढण्याची शक्यता आहे.” यासोबतच गुगलने या निर्णयाचा आढावा घेण्याचे सांगितले होते.
Google Again fine of 1338 Crore Rupees