नाशिक: शहर पोलिस दलातील गुगलने बेपत्ता असलेल्या दहा वर्षाच्या बलिकेचा वीस मिनीटातच शोध लावला. गुन्हेगारांचा माग काढण्यात तरबेज असलेल्या गुगलने बेपत्ता बालिकेचा शोध लावल्याने नागरिकांकडून श्वान पथकाचे विशेष कौतुक होते आहे. उपनगर पोलिस ठाणे हट्टीतील भीम नगर येथील दहा वर्षाची बालिका रात्री वडिलांबरोबर फिरायला घराबाहेर पडली. फिरुन झाल्यानंतर पित्याने मुलीला घराच्या जवळ सोडले आणि ते कामानिमित्त पुढे गेले. मात्र पिता पुन्हा घरी परतल्यानंतर बालिका घरात नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी परिसरात शोधा शोध सुरु केली. मात्र तीचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे पालक उपनगर पोलिसांकडे पोहचले. घटनेतील गांभीर्य ओळखून श्वान पथकास पाचारण करण्यात आले. हँडलर गणेश कोंडे यांनी याबाबत गुगल या डॉबेरमेन जातीच्या श्वानाला बेपत्ता बलिकेच्या वापरत्या कपड्यांचा वास दिला. यानंतर गुगलने अवघ्या वीस मिनीटातच मुलीचा शोध घेतला. या प्रकरणात अद्याप काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी असून त्या दृष्टीकोनातून उपनगर पोलिस तपास करीत आहेत. हरवलेली मुलगी परत मिळताच पालकांचे आनंद अश्रू अनावर झालेत. पालकांनी गुगलचे आभार मानले. शहारत आज गुगलच्या या कामगिरीची चांगलीच चर्चा झाली.