नवी दिल्ली – देशभरात सर्वसामान्यांना सध्या एका चिंतेने ग्रासले आहे ते म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी कमी होणार. याचसंदर्भातील मोठी खुशखबर आहे. लवकरच पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर ४ रुपये तर डिझेलच्या किंमती प्रति लिटर ५ रुपयांनी घटणार आहेत.
इंधनाच्या म्हणजेच पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या असून प्रति लिटर त्यांचा दर शंभरी पार झाल्याने वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याने सहाजिकच सार्वजनिक वाहतुकीवर देखील परिणाम होऊन महागाईमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला देखील याची काळजी वाटत आहे. परंतु आता केंद्र सरकारसह सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी असून पेट्रोलच्या दरामध्ये प्रतिलिटर ४ रुपये तर डिझेलच्या दरात ५ रुपयांनी घट होणार आहे.
केंद्र सरकार आणि सर्व सामान्य ग्राहक यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सुमारे १० डॉलरने घट झाली आहे. गेल्या आठ दिवसांत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७७.६० डॉलरवरून ६८.४० डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले आहेत. तसेच गेल्या १० महिन्यांतील कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ही सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे देशातील सरकारी तेल कंपन्या लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती कमी करतील.
गेल्या आठ दिवसांत केवळ ८.२० डॉलरच्या क्रूडच्या किंमतीच्या आधारे गणना केली तरीही पेट्रोलच्या किरकोळ किंमतीत प्रतिलिटर ४ रुपये आणि डिझेलमध्ये ५ रुपयांनी कपात होण्याची शक्यता आहे. त्यात घट झाल्यास राजकीयदृष्ट्या सरकारलाही मोठा दिलासा मिळणार आहे.
जेव्हा संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असते, तेव्हा विरोधी पक्ष सतत महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत असतो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोलियम पदार्थांच्या केंद्रीय कराच्या तुलनेत ३.३५ लाख कोटी रुपयांच्या वसुलीचा मुद्दा उपस्थित केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाच्या स्वस्ततेमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर आपोआप खाली येतील आणि सरकारच्या महसूल वसुलीवर कोणताही परिणाम होणार नाही.
पेट्रोलियम उत्पादने ही केंद्र आणि राज्य सरकारच्या महसूल संकलनाचा सर्वात मोठा स्रोत आहे. परंतु सरकारला आणखी एक फायदा म्हणजे त्यामुळे महागाई दर कमी करण्यात मदत होईल. तथापि, गेल्या आठवड्यात क्रूडच्या किंमती खाली येण्याची दोन मुख्य कारणे आहेत. तेल उत्पादक देश संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियामधील वाद संपल्यामुळे जागतिक क्रूड उत्पादनात दररोज चार लाख बॅरलने वाढ झाली आहे. तसेच, कोरोनाच्या ढासळत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लादण्यात आले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी समुदाय निराश झाला आहे. रोजगार परत रुळावर येण्यास वेळ लागेल. त्यामुळे इंधनाच्या खपावर परिणाम झाला आहे.