नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नामिबियातील सिया या मादी चित्त्याने चार पिल्लांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव म्हणाले की, मादी चित्ता आणि चार लहान पाहुणे सध्या पूर्णपणे निरोगी आहेत. नवीन पाहुणे आणि मादी चिता यांची विशेष टीम विशेष काळजी घेत आहे. चित्ता संवर्धन प्रकल्पाशी निगडित अधिकाऱ्यांनी नवीन पाहुण्यांच्या आगमनावर आनंद व्यक्त केला आहे.
कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते त्यांच्या नवीन वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेत असल्याचे सकारात्मक लक्षण आहे. भारतातील वन्यजीव लोकसंख्येमध्ये चित्त्यांचा पुन्हा समावेश करण्यासाठी हे उद्यान योग्य अधिवास म्हणून तयार केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त मोदींनी मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचा समावेश असलेले आठ चित्ते सोडले होते. अलीकडेच एका मादी चित्ता साशाचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, नामिबियातून भारतात आणलेल्या एका मादी चित्त्याने चार पिल्लांना जन्म दिला आहे. ‘अमृत काल’ दरम्यान भारताच्या वन्यजीव संरक्षण इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे त्यांनी वर्णन केले. त्यांनी म्हटले आहे की, “मला हे कळवायला आनंद होत आहे की, 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतात आणलेल्या चित्त्याच्या चार बाळांचा जन्म झाला आहे.” चित्ता भारतात परत आणण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल आणि भूतकाळात झालेली पर्यावरणीय चूक सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मंत्र्यांनी प्रोजेक्ट चिताच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
दोन दिवसांपूर्वी साशाचा मृत्यू झाला
नामिबियातील साशा ही मादी चित्ता सोमवारी, २७ मार्च रोजी कुनो नॅशनल पार्कमध्ये मृतावस्थेत आढळून आली. त्यांची किडनी निकामी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. या बातमीने देशात चित्त्यांचा पुनर्वसन करू इच्छिणाऱ्या वन्यजीवप्रेमींना धक्का बसला, मात्र चार पिल्ले एकत्र जन्माला आल्यानंतर आता चित्त्यांच्या देशात पुन्हा स्थायिक होण्याच्या आशा पल्लवित होताना दिसत आहेत.
https://twitter.com/byadavbjp/status/1640989652239925249?s=20
गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून आठ चित्ते आणून कुनो येथे सोडण्यात आले होते, तर 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची आणखी एक तुकडी भारतात आणण्यात आली होती. या 12 चित्त्यांमध्ये सात नर आणि पाच माद्या होत्या. सर्व चित्त्यांसह, सध्या कुनोमधील चित्त्यांची संख्या 23 झाली आहे.
भारतातील शेवटचा चित्ता 1947 मध्ये सध्याच्या छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात मरण पावला आणि 1952 मध्ये ही प्रजाती नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी 2009 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या अंतर्गत चित्त्यांची भारतात पुन्हा ओळख करून देण्याच्या उद्देशाने ‘प्रोजेक्ट चीता’ सुरू केली. देशातील अनेक राज्यांमधील सर्वेक्षणानंतर मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क हे चित्त्यांच्या पुनर्वसनासाठी अनुकूल मानले गेले आणि प्रकल्प चित्तासाठी त्याची निवड करण्यात आली. जवळपास 22 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 2022 मध्ये प्रथम आठ चित्ते नामिबियातून आणण्यात आले, तर यावर्षी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले.
Good News Kuno National Park Cheetah 4 Cubs Born