नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष सातवा वेतन आयोगाकडे लक्ष लागलेले आहे, त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार लवकरच खुशखबर देऊ शकते. महागाई भत्ता, एचआरए, टीए, प्रमोशन मिळाल्यानंतर आता त्यांचा पगार पुन्हा एकदा वाढू शकतो. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवले जाऊ शकते. फिटमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 8000 रुपयांपर्यंत वाढू शकते. कारण त्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवावा, अशी केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. आता मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर विचार करेल अशी अपेक्षा आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे थोडा विलंब होऊ शकतो. मात्र असे असले तरी मार्चपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त फायदा जाहीर होण्याची शक्यता आहे. होळी सणाची भेट म्हणून कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर ठरवता येईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत निर्णय घेतल्यास मूळ वेतनात थेट वाढ होईल. मूळ वेतनात वाढ झाल्याने इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर 2.57 च्या आधारे वेतन मिळत आहे. आता ते 3.68 पर्यंत वाढवले जाऊ शकते. केंद्र सरकारमधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विभाग असे मानतात की 7 व्या CPC अंतर्गत, किमान वेतन थेट 3.68 पटीने नाही तर 3 पटीने वाढवले जाऊ शकते. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, सरकार फिटमेंट फॅक्टर 3 पट वाढवू शकते. जर फिटमेंट फॅक्टर 3 पट असेल तर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 21,000 रुपये होईल. म्हणजेच 3000 रुपयांनी वाढणार आहे.
तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत नसून पर्याय शोधत असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. मात्र कर्मचारी संघटनेने यापूर्वीच कॅबिनेट सचिवांची भेट घेतली असून याप्रकरणी सकारात्मक संकेत मिळाले आहेत.