मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतात सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. सोन्याचे भाव कितीही वाढले तरी खरेदी करणाऱ्यांची संख्या कधीही घटली नाही. सोन्याप्रमाणे चांदीच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांची संख्याही लक्षणीय आहे. चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी आता आणखी एक मार्ग खुला झाला आहे. गुंतवणूकदार आता एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) च्या माध्यमातून चांदीमध्ये गुंतवणूक करू शकणार असून, या गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष चांदी खरेदी करण्याची आवश्यकता नाही.
सराफा बाजारात भागीदारी वाढवण्याच्या उद्देशाने भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोने ईटीएफचे अनावरण केले होते. त्यानंतर तीन प्रमुख म्युच्युअल फंड हाउसनी याच वर्षी जानेवारीमध्ये सोने ईटीएफ सादर केले आहे. इतर म्युच्युअल फंड हाउसकडूनही याची तयारी सुरू झाली आहे. आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसी, निप्पोन इंडिया एएमसी आणि आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी या तीन म्युच्युअल फंड हाउसनी चांदीच्या ईटीएफची ओळख करून दिली आहे. आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसीने यासाठी २७० कोटी रुपये तसेच निप्पोन इंडिया एएमसीने १७० कोटी रुपये उभारले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किमतीत गेल्या दहा वर्षांमध्ये ११ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत २७.८४ डॉलर प्रति औंस होती. २०२१ मध्ये ११.७२ टक्के घटून २३.३१ डॉलर प्रति औंस झाली आहे. गेल्या दहा वर्षांत चांदीचे चक्रवाढ वार्षिक वाढीचे (सीएजीआर) दर शून्यवरून घटून उणे २.८३ टक्के झाले आहे. सोन्याचे सीएजीआर ३.२१ टक्के झाले असून, निफ्टी-५० च्या ६.५५ टक्के राहिली आहे.