नवी दिल्ली – सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांसाठी खूशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एका योजनेची सुरुवात केली असून, कर्मचारी पेन्शन योजना १९९५ अंतर्गत सदस्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. विभागाच्या या वेगळ्या प्रयत्नांमुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना निवृत्तीवेतन आणि इतर देयकांच्या लाभासाठी कार्यालयांचे उंबरठे झिझवावे लागणार नाहीत.
ईपीएफओने या योजनेला ‘प्रयास’ नाव दिले आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने कोरोना महामारीदरम्यान ग्राहकांना अखंड सेवा सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक आणि डिजिटल पुढाकार घेतला आहे. ईपीएफओच्या पुढाकाराचे कर्मचार्यांनी स्वागत केले आहे. आतापर्यंत सेवानिवृत्तीपर्यंत कर्मचार्यांना वाट पाहावी लागत होती. पूर्वी निवृत्तीवेतनाचे कागदपत्र मिळविण्यासाठीच एक-एक वर्ष जायचे. त्यातून आता सुटका होणार आहे.
सेवानिवृत्तीनंतर कर्मचार्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. सर्वात आधी कर्मचार्यांना सेवानिवृत्त झाल्याचे कागदपत्र मिळविण्यासाठी विभागीय ईपीएफ कार्यालयात जावे लागत होते. तसेच सर्व कागदपत्र घेण्यासाठी कंपनीत चकरा माराव्या लागत होत्या.
ही योजना सुरू झाल्यानंतर आता सेवानिवृत्तीच्या काही दिवसांआधीच सेवानिवृत्तीचे कागदपत्र कंपनीच्या माध्यमातून जमा करून सेवानिवृत्तीच्या दिवशीच सदस्यांना निवृत्तीवेतनाची ऑर्डर मिळविता येणार आहे. ऑर्डर जारी होताच विभागाकडून नियमितरित्या सदस्यांच्या बँक खात्यात निवृत्तीवेतन जमा होत राहील. पूर्वी नोव्हेंबर महिन्यात दिले जाणारे ऑनलाइन हयातीचे प्रमाणपत्र आता वर्षातून कधीही देता येणार आहे. कर्मचार्यांच्या सोयीनुसार ते कधीही जमा करता येईल.