नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांसाठी मोठी खुषखबर आहे. नाशिकहून हैदराबाद आणि नवी दिल्ली ही विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी स्पाइसजेट या कंपनीने तिकीट बुकींग सुरू केले आहे. ही सेवा या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. त्यामुळे आणखी दोन शहरे आता नाशिकशी हवाई कनेक्ट होणार आहेत.
सद्यस्थितीत ट्रुजेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद, अलायन्स एअर कंपनीची नाशिक-अहमदाबाद, नाशिक-पुणे आणि नाशिक-दिल्ली (व्हाया अहमदाबाद) या सेवा सुरू आहेत. त्यात आता दोन नवीन सेवांची भर पडली आहे. हैदराबाद आणि दिल्ली या दोन्ही शहरांसाठी आता पुन्हा थेट सेवा सुरू होणार आहे. या दोन्ही सेवा पूर्वी सुरू होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटात त्या बंद पडल्या. त्यानंतर त्या आता सुरू होत आहेत. विमानसेवेचे बुकींग सुरू झाल्याने उद्योजक, व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नाशिक – हैदराबाद विमानसेवा येत्या २२ जुलै तर नाशिक -दिल्ली विमानसेवा ४ ऑगस्टपासून पुन्हा सुरळीतपणे सुरू होणार असून आजपासून लॉनलाईन तिकिट बुकींग प्रणाली सुरू झाल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. नाशिक-हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस तर नाशिक-दिल्ली विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे.
अशा आहेत वेळा
हैदराबाद – नासिक हे विमान हैदराबाद येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी निघणार असून तेच विमान पुन्हा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ओझर येथून हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे. दिल्ली -नाशिक हे विमान सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी रोज दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण घेणार असून तेच विमान नाशिकहून पुन्हा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दिल्लीसाठी टेक- अप होणार आहे. नासिक – हैदराबाद या विमानात प्रवाशांची क्षमता 80 असणार असून हा प्रवास अवघ्या 90 मिनिटांचा रहाणार आहे. तर नाशिक -दिल्ली विमानात विमानात 189 प्रवाशांची आसन क्षमता असणार असून प्रवास दोन तासांचा असणार आहे.
Good News For Nashik New Delhi and Hyderabad Air service Booking started from Spicejet