मुंबई – इंजेक्शनला घाबरुन लस न घेणाऱ्यांसाठी महत्त्वाचे तर नाशिक आणि जळगावकरांसाठी आनंदाचे वृत्त आहे. नाशिक आणि जळगावची निवड पायलट प्रोजेक्टसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुई शिवाय दिली जाणारी झायकोव्ह डी ही लस आता नाशिक आणि जळगावमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
कोरोना प्रतिबंधिक लस म्हणून मान्यता मिळालेल्या झायडस कॅडिला कंपनीच्या झायकोव्ह-डी या लशीचा वापर महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये केला जाणार आहे. ज्यांनी अद्याप लशीचा एकही डोस घेतलेला नाही, असे नागरिक असलेले जिल्हे शोधून पात्र नागरिकांना लस दिली जाणार आहेत. महाराष्ट्रात ही लस नाशिक आणि जळगाव मध्ये सर्वप्रथम दिली जाणार आहे. त्याचे यशापयश पाहून अन्य जिल्ह्यांमध्ये हे लसीकरण राबविले जाणार आहे.
प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण
सूत्रांच्या माहितीनुसार, सात राज्यांमध्ये वयस्कांना झायकोव्ह-डी लस देण्यात येणार आहे. १२ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना देण्यात येणारी ही देशातील पहिली लस आहे. जायकोव्ह-डी लस देण्यासाठी प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
लस देण्याची पद्धत
इंजेक्टर गनच्या माध्यमातून लस दिली जाईल. त्यामुळे सुई टोचण्याची वेदना होणार नाही. या तंत्रात वापरण्यात येणारी इंजेक्टर गन सामान्य इंजेक्शनच्या तुलनेत ५० पट अधिक वेगवान आहे. त्वचावर ठेवून फक्त थोडा दाब द्यावा लागणार आहे. गनच्या वरच्या भागात लागलेले सेंसर शरीरातील नसांचा शोध घेईल. बटन दाबताच लस प्रतिसेकंद २०० मीटरच्या वेगाने शरीरात प्रवेश करेल. ०.३ सेकंदात लशीचा एक डोस नसांमध्ये पोहोचेल. एका व्यक्तीला कोरोनाच्या लशीचा एक डोस ०.५ एमएल दिला जाऊ शकतो. दरम्यान, या लशीची किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु तीन डोस असलेली ही लस १९०० ते २००० रुपयांपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
गन देणार माहिती
फॉर्मा जेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंजेक्टर गन वायफाय युक्त असेल. गनच्या वरच्या भागावर सेंसर लावण्यात आले आहे. हे सेंसर शरीरातील नसांचा शोध घेईल. लस दिल्यानंतर खालच्या बाजूला एका स्क्रिनवर उजव्या बाजूला हिरव्या रंगाचे निशाण दिसेल. त्यामुळे लस योग्यरित्या दिली आहे की नाही हे ते सांगेल. इंजेक्टर गनपर्यंत पोहोचण्यासाठी एप्लिकेटर (लस असेलेले एक उपकरण) चा प्रयोग केला जाईल. हे एप्लिकेटर वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असेल.
यामुळे तंत्र आहे महाग
– प्रत्येक व्यक्तीला आधी २८ आणि ५६ दिवसांत लशीचे तीन डोस द्यावे लागतील.
– प्रत्येक डोसमध्ये दोन शॉट म्हणजेच तीन डोसमध्ये सहा शॉट दिले जातील.
– प्रत्येक डोसमध्ये एक एप्लिकेटरचा वापर केला जाईल. तो ९० रुपयांचा असेल.
– इंजेक्टर गनची किंमत २५ हजार ते ३० हजार रुपये आहे. २० हजार शॉट दिले जाऊ शकतात.
– एका इंजेक्टर गनद्वारे ३,३३३ नागरिकांचे लसीकरण होऊ शकते.