इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगात प्रथमच कोविड-१९ विरोधी लशीद्वारे कोरोना संसर्गावर उपचार केल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोनाबाधित व्यक्तीला फायझर लशीचे एकूण दोन डोस देण्यात आले. त्यानंतर ती व्यक्ती ७२ दिवसांत कोरोनातून मुक्त झाली, असा दावा वेल्स येथील कॅड्रिफ विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केला आहे.
क्लिनिकल इम्युनोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, वेल्सच्या पोंटिप्रिड येथील रहिवासी इयान लेस्टर हे कोरोनाबाधित झाल्याची पुष्टी डिसेंबर २०२० मध्ये करण्यात आली होती. ३७ वर्षीय इयान यांना बरे होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागला. ऑगस्ट २०२१ मध्ये ते कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. यादरम्यान त्यांना छातीत दुखणे, डोकेदुखी आणि अत्याधिक थकवा जाणवला.
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, इयान हे जन्मतःच अनुवांशिक रोगप्रतिकारकशक्ती विहिनतेच्या आजाराने ग्रस्त आहेत. असे रुग्ण अधिक संवेदनशील असतात. हा आजार रक्ताच्या गाठी बनवण्यापासून रोखतो. इयानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकामधील डॉ. मार्क पोंसफोर्ड सांगतात, इयानचा अंतिम कोरोना निगेटिव्ह अहवाल येण्याचा क्षण खूपच आश्चर्यकारक क्षण असल्याचे संबोधले आहे. चव आणि वास दोन्ही कमी झाल्यानंतर इयान यांनी पहिल्यांदा वेल्स विद्यापीठाच्या रुग्णालयाला माहिती दिली. इयान यांच्यावर लहानपणापासून विस्कॉट-एल्ड्रिच सिंड्रोमवर उपचार सुरू होते.
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, फायजरच्या लशीमुळे अँटिबॉडी वेगाने विकसित होण्यास सुरुवात झाली. या अँटिबॉडी नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या अँटिबॉडीपेक्षा अधिक ताकदवान होत्या. लशीने टी-पेशींची पातळी वाढली होती. इम्युनोलॉजी सेंटरचे प्राध्यापक स्टिफन जोल्स सांगतात, शरीरात बळकट रोगप्रतिकारक शक्ती प्रतिसादाला प्रोत्साहित करून लस विषाणू संपवण्यास मदत करू शकते का, या प्रश्नाच्या उत्तरावर आम्हाला आश्चर्य वाटले. मात्र रुग्णाच्या शरीराने लशीला किती वेगात प्रतिसाद दिला याबद्दल वैज्ञानिकांनी स्पष्ट केले नाही.
इयान लेस्टर यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले. ते सांगतात, मी कधी बरा होऊ शकेल, ही आशा मी सोडली होती. कारण दर १० ते १४ दिवसांत करण्यात येणारी कोविडची प्रत्येक चाचणी पॉझिटिव्ह येत होती. साधारणतः कोविडमधून बरे झाल्यानंतर कोविडविरोधी लस घेण्याचा सल्ला दिला जातो. परंतु माझ्या डॉक्टरांनी लशीने उपचार घेण्याचा सल्ला दिला होता.