नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेत खाद्यतेल कंपन्यांनी तेलाच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काही कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किमतीत १० ते २० रुपयांनी घट केली आहे. सूर्यफूलाच्या तेलाचा पुरवठा सुरळीत होत असल्याने किमती कमी झाल्याचे बोलले जात आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार रशिया आणि अर्जेंटिनासारख्या खाद्यतेलाचा पुरवठा करणाऱ्या देशातून मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा होत आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या किमतींवर झाला आहे. तेल मुबलक प्रमाणत उपलब्ध झाल्यानंतर किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातशुल्कात कपात केल्याने तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत.
खाद्यतेलाची विक्री करणाऱ्या मदर डेअरी कंपनीने सूर्यफूल, मोहरी, सोयाबीनच्या तेलात मोठी घट केली आहे. मदर डेअरीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, कंपनीने धारा ब्रँडच्या नावाने विक्री करणाऱ्या सर्व तेलांच्या दरात घट केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात झालेली घट, सरकारकडून केले जाणारे प्रयत्न आणि पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे सर्व प्रकारच्या तेलांच्या दरात घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या पाम तेल्याच्या किमतीत प्रतिलिटर ७ ते ८ रुपयांनी घसरण झाली आहे. सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलाच्या दरात प्रतिलिटर १० ते १५ रुपयांनी घट झाली आहे. सोयबीन तेल पाच रुपये प्रतिलिटर दराने स्वस्त झाले आहे. फॉर्च्युन ब्रँडअंतर्गत विक्री केल्या जाणाऱ्या सर्व खाद्यतेलाच्या किमती कमी करणार आहे, अशी माहिती अदानी विल्मरच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हैदराबाद येथील जेमिनी एडीब्लेड्स अॅण्ड फॅट्स या कंपनीनेसुद्धा सूर्यफुलाच्या एका पाउचची किंमत १५ रुपयांनी कमी केली आहे. या आठवड्यात कंपनी खाद्यतेलाच्या किमतीत आणखी २० रुपयांनी घट करण्याची शक्यता आहे.