नाशिक – वेगाने विकसित होत असलेल्या नाशिक शहरात दिवसेंदिवस नवनीवन ब्रँड दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच डी मार्ट सारख्या मोठ्या ब्रँडने त्यांचे दालन नाशकात सुरू केले आहे. त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. यापूर्वीच नाशकात शॉपर्स स्टॉप, डिकॅथलॉन, ब्रँडस फॅक्टरी यांनी सेवा सुरू केली आहे. त्याला उत्तम प्रतिसाद आहे. आता नाशकात आणखी एक बहुराष्ट्रीय ब्रँड दाखल होत आहे.
चहा आणि कॉफीच्या क्षेत्रातील अत्यंत नामांकीत ब्रँड असलेले स्टारबक्स (Starbucks) आता नाशकात दाखल होत आहे. येत्या ४ जानेवारीपासून स्टारबक्सची सेवा मिळणार आहे. सिटी सेंटर म़ॉलजवळील श्री जी स्टेट बिल्डींगमध्ये हे दालन सुरू होत आहे. स्टारबक्स या ब्रँडची १९७१ मध्ये अमेरिकेत सुरुवात झाली. त्यानंतर या ब्रँडचा जगभरात विस्तार झाला आहे. दररोज कोट्यवधी ग्राहकांना या ब्रँडची सेवा दिली जाते. आता हा ब्रँड नाशकात येत असल्याने नाशिककरांना बहुराष्ट्रीय कॉफी आणि चहाची चव मिळणार आहे. तसेच, नाशकात स्टारबक्सच्या रुपाने आणखी एक बहुराष्ट्रीय ब्रँडची सेवा कार्यरत होणार आहे. नाशिक हे वेगाने प्रगतीपथावर असल्याचे हे द्योतक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.