नवी दिल्ली – सरकारी नोकरीत जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. २०२० ने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या साऱ्यांच्याच आशेवर पाणी फेरले. नवीन वर्षात मात्र अनेकांची ही इच्छा पूर्ण होणार असून यंदा केंद्र आणि विविध राज्ये मिळून तब्बल ३२ हजार सरकारी नोकऱ्यांच्या जागा निघण्याची शक्यता आहे. यासाठी अर्जाची प्रक्रियाही याच महिन्यात सुरू होऊ शकते. दरम्यान, गेल्या वर्षीच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. सध्या त्याची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
केंद्रीय मंत्रालये तसेच विभागात ६५०६ जागा
केंद्र सरकारची मंत्रालये, विभाग तसेच अन्य संघटनांमध्ये ब आणि क वर्गातील जवळपास ६५०६ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी कर्मचारी निवड आयोग सीजीएल २०२० परीक्षेद्वारे उमेदवार निवडणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ ssc.nic.in येथे ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात.
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये २ हजार पदे
केंद्रीय गृहमंत्रालया अंतर्गत गुप्तचर यंत्रणेत असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स अधिकाऱ्यांच्या (श्रेणी २) या पदासाठी २ हजार जागांची भरती होत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ९ जानेवारी पर्यंत हे अर्ज करता येतील. mha.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची अधिक माहिती मिळेल.
ग्रामीण डाक सेवकांच्या ४२६९ जागा
इंडियन पोस्ट कर्नाटक आणि गुजरात पोस्टल सर्कलमधील विविध पोस्ट कार्यालयात ग्रामीण डाक सेवकांची भरती करणार आहे. या ४२६९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ डिसेंबर पासूनच सुरू झाली असून २० जानेवारी पर्यंत अर्ज करता येणे शक्य आहे. इच्छूकांनी appost.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
लोकसेवा आयोग ४०० पदे
लोकसेवा आयोगातर्फे राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील ३७० तर भारतीय नौसेना अकादमीत ३० पदे रिक्त आहेत. यासाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू आहे. upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. १९ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.
स्टेट बँकेत ४८९ जागा
देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने ४८९ जागांसाठी भरती काढली आहे. विविध विभागात असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, इंजिनिअर अशा पदांसाठी ही भरती होणार आहे. sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. २२ डिसेंबरपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून ती ११ जानेवारीपर्यंत सुरू राहील.
याशिवाय बिहार, हरयाणा, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्येही विविध विभागात भरती होणार आहे.