नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आता कोरोना लसीप्रमाणेच न्यूमोनिया आजाराची प्रथम स्वदेशी लस विकसित केली आहे. ही लस बाजारात उपलब्ध झाली असून आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते तिचे लाँचिंग करण्यात आले. सद्यस्थितीत दोन परदेशी कंपन्यांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या या लशीच्या तुलनेत ही लस खूपच स्वस्त राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
पुणे येथील सीरम संस्थेने भारत आणि आफ्रिकेच्या गॅम्बियामधील लसीच्या पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या केल्या आहेत. न्यूूमोनिया आजारावर विकासित झालेली ही पहिली स्वदेशी लस आहे.
दरम्यान, फायसर्सच्या एनवायएसई (पीएफई) व ग्लॅक्सोस्मिथक्लाइनच्या (एलएसई ) जीएसकेपेक्षा ही लस अधिक परवडणारी असेल, असे सूत्रांनी सांगितले. सीरम संस्थेचे अवर संचालक प्रकाश कुमार सिंह म्हणाले की, जगासाठी व्होकल फॉर लोकल तसेच मेक इन इंडिया अंतर्गत पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न आहे.
कोविड -१९ या साथीच्या आजाराच्या काळात सर्व जगभरात सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान भारताने विकासित केलेल्या पहिल्या जागतिक स्तरावरील न्यूमोनिया लस ही वैद्यकीय संशोधनातील ऐतिहासिक घटना ठरणार आहे. कारण, युनिसेफच्या आकडेवारीनुसार, न्यूमोनियामुळे भारतात दरवर्षी शून्य ते पाच या वयोगटातील एक लाखाहून अधिक मुलांचा मृत्यू होतो. न्यूमोनिया हा श्वसन रोग असल्याने कोविड -१९ च्या साथीच्या वेळी न्यूमोनियाची लस अत्यंत महत्वाची ठरणार आहे. महागड्या दराने परदेशी कंपन्यांच्या लसीच्या आयातीवर भारत अवलंबून आहे, असे सूत्रांनी सांगितले.