नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील वडपे ते गोंदे भागाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून गोंदे ते पिंपरीसदो या २० किलोमीटर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग या अद्ययावत तंत्रज्ञानाने सहापदरीकरण करण्यात येणार आहे. सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कपात सूचनेवरील लेखी उत्तरात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.३ नाशिक ते मुंबई या रस्त्याच्या दुरावस्थेवर उपाययोजना करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सातत्याने पाठपुरावा करत आहे.मुंबई ते नाशिक रस्त्यावरील खड्यांची समस्या व त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या प्रश्नांबाबत राज्याचे त्यांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले. तसेच या रस्त्याचे सहापदरीकरण करण्याची त्यांची सातत्याची मागणी आहे. याबाबत त्यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु असून त्यांनी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात कपात सूचना देखील मांडली होती. या कपात सूचनेवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे लेखी माहिती दिली आहे.
छगन भुजबळ यांच्या कपात सूचनेवरील लेखी उत्तरात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे की, मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग (NH-3) केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणांच्या अखत्यारीत आहे. सदर महामार्गावरील वडपे ते ठाणे या लांबीमध्ये पावसाळयात पडलेल्या खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत अस्तित्वातील डांबरी रस्त्याचे आवश्यक त्या भागात नूतनीकरण करण्यात येत असुन कशेळी व कळवा पुलाचे काम करण्यात येत आहे. उर्वरीत नेहमी खड्डेमय होणा-या रस्ताखंडासाठी “Soil Stabilization” ही प्रक्रिया मागील वर्षी राबविण्यात येऊन खड्डयांवर नियंत्रण मिळविले असल्याचे म्हटले आहे.
वडपे ते ठाणे या भागात वाहतूक क्षमतेएवढी अस्तित्वातील रस्त्याची रुंदी नाही. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्याकरिता केंद्र शासनाने वडपे ते ठाणे दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरणाने आठ पदरी रस्त्याचे बांधकामास सुरुवात केली आहे. प्रकल्पाअंतर्गत आठ पदरी रस्त्यासह २ पदरी सर्विस रोड. भुयारी मार्ग, लहान व मोठे पूल यांचा बांधकामात समावेश आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या व्यतिरीक्त घोटी-सिन्नर, पिंपरीसदो, कसारा वशाळा, आसनगाव, वाशिंद, खडवली आणि कल्याण बापगाव जंक्शनवर उड्डाणपूल अथवा बोगदयाची कामे सुरु असून रस्ता विस्तारीकरणामुळे स्थानिक आणि अवजड वाहतुकीचे विभाजन होईल असे म्हटले आहे.
तसेच वडपे ते गोंदे या ९९.५० कि.मी. लांबीच्या चौपदरीकरणाचे काम BOT तत्वावर सवलतदारास दि.१२.०४.२००६ पासुन २० वर्षाच्या सवलतीच्या कालावधीसह म्हणजे ११.०४.२०२६ पर्यंत देण्यात आले आहे. सद्यस्थितीत सदर प्रकल्प महामार्ग O & M टप्प्यात आहे. सदर कामाचे पर्यवेक्षण स्वतंत्र अभियंता करत असून सदर रस्ता BOT तत्वावर असल्याने त्यावर केंद्र शासन खर्च करीत नाही. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरिल वडापे गोंदे भागाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर सदर महामार्गावरील काही वाहतुक समृध्दी महामार्गावर वळविण्याचे नियोजन असल्याचे म्हटले आहे.
त्याचबरोबर गोंदे ते पिंपरीसदो ह्या २० कि.मी. लांबीचा एन.एच.(O) मध्ये समावेश झाला असुन त्याला केंद्रीय मंत्रालयाची मान्यता मिळली आहे.ह्या लांबीत “White Topping” या अद्ययावत तंत्रज्ञानाने सहापदरीकरण, सेवा रस्ते, गजबजलेल्या चौकांसाठी उड्डाणपूल किंवा बोगदे बांधण्याचे नियोजन आहे. अतिवृष्टी व जड वाहतुक, तसेच वाढते शहरीकरण, रिबन डेव्हलपमेंट, लॉजिस्टीक पार्क व रहदारीचे वाढते प्रमाण तसेच सेवा रस्ते व उड्डाणपूल यांच्या अभावामुळे स्थानिक वाहतुक व महामार्गीय वाहतुक एकत्र येत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. सदर समस्या दुर करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी उत्तरात म्हटले आहे.
Gonde Pimpri Highway Six Lane