अबुधाबी – भारतातील दोन होमिओपॅथिक डॉक्टरांना संयुक्त अरब अमिरातीचा प्रतिष्ठीत समजला जाणारा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. या व्हिसाच्या अधारावर त्यांना संयुक्त अरब अमिरातीचे नागरिकत्व मिळाले आहे. दोन डॉक्टरांपैकी नाशिक आणि पंजाबमधील डॉक्टरांना हा मान मिळाला आहे.
खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील नाशिकचे डॉ. हसनैन मोतीवाला आणि पंजाबमधील खन्ना येथील डॉ. अनुप्रिया बत्रा या भारतीय डॉक्टरांना यूएई सरकारतर्फे ओळख आणि नागरिकत्वाचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. डॉ. मोतीवाला यांना १ जुलै रोजी यूएईकडून गोल्डन व्हिसा मिळाला. गेल्या सात वर्षांपासून डॉ. मोतीवाला यूएई मध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. दुबई येथील अल दियाफा मॉडर्न मेडिकल सेंटर आणि अॅक्वा क्लिनिक येथे ते कार्यरत आहेत. यूएईमधील सर्व समाजबांधव आणि कुटुंबीयासाठी ही खरोखरच अभिमानास्पद घटना आहे. यूएई सरकारने हा सन्मान केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, अशा भावना डॉ. मोतीवाला यांनी व्यक्त केल्या.
पंजाबमधील डॉ. अनुप्रिया बत्रा यांना यूएई सरकारकडून ८ जुलै रोजी गोल्डन व्हिसा प्रदान करण्यात आला. डॉ. बत्रा सध्या अल-नहादा, दुबई येथील बत्रा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. गोल्डन व्हिसाचा अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोपी होती. मला व्हिसा त्वरित मिळाला, असे डॉ. बत्रा यांनी खलीज टाइम्सला सांगितले. यूएईच्या नेत्यांची मी आभारी आहे. होमिओपॅथी डॉक्टरची ओळख देण्यासाठी तसेच माझा अर्ज स्वीकृत करण्यासाठी अधिका-यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहे, असे डॉ. बत्रा यांनी सांगितले.