नवी दिल्ली – कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्कृष्ट पदावर पोहोचण्यासाठी इच्छा हवीच. पण सोबत कठोर मेहनत, जिद्द आणि त्याग करण्याची तयारी असेल तरच यश तुमच्या पायाशी लोळण घालते. हेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेत्या भालाफेकपटू नीरज चोप्राने दाखवून दिले आहे. नीरजचे वय अवघे २३ वर्षांचे आहे. पण या वयातही त्याने केलेली मेहनत निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे. त्याच्या यशाचे गमक काय आहे हे आपण जाणून घेऊयात.
ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणार्या नीरज चोप्राला सहजासहजी यश मिळालेले नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला मोठे त्याग करावे लागले आहेत. खेळावर लक्ष केंद्र राहावे यासाठी त्याने एका वर्षापूर्वी मोबाईल फोन वापरणे सोडून दिले. तो नेहमची मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवायचा. आई सरोज आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी बोलण्यासाठी तो स्वतः व्हिडिओ कॉल करत होता. सोशल मीडियापासून तो नेहमीच दूर राहिला आहे. संयुक्त कुटुंबात वाढलेल्या नीरजला आई-वडिलांशिवाय तीन काका आहेत. एकाच छताखाली तब्बल १९ सदस्यांच्या कुटुंबात दहा चुलत भावा-बहिणींमध्ये नीरज सर्वात मोठा आहे. त्यामुळे तो कुटुंबात सर्वात लाडाने वाढलेला सदस्य आहे.
हलाखीचा काळही सोसला
भालाफेक खेळात पुढे जाण्यासाठी नीरजला आर्थिक मदतीची गरज होती. चांगली उपकरणे आणि चांगल्या आहाराची आवश्यकता होती. परंतु संयुक्त कुटुंब, शेती हाच व्यवसाय आणि कुटुंबात सदस्यसंख्या अधिक असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. नीरजला सरावासाठी १.५ लाखाचा भाला घेऊन देण्याची ऐपत नव्हती. वडील सतीश चोप्रा आणि काका भीम यांनी कसेबसे सात हजार रुपये जमवून नीरजला सरावासाठी भाला आणून दिला.
विश्वविक्रम
२०१६ मध्ये कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत वीस वर्षांच्या आतील गटात ८६.४८ मीटर भालाफेकीचा जागतिक विक्रम करून त्याने सुवर्णपदक पटकावले होते. या कामगिरीमुळे नीरज प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. २०१७ रोजी लष्करामध्ये भरती झाल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. नीरज सांगतो, “मी एका शेतकरी कुटुंबातून आलो आहे. कुटुंबातील कोणालाही सरकारी नोकरी नाही. माझे कुटुंब खूपच कठीण परिस्थितीत मला आधार देत आले आहे. परंतु आता माझे प्रशिक्षण सुरू ठेवण्यासोबतच मी कुटुंबाला आर्थिकरित्या सक्षम बनविण्यास सिद्ध झालो आहे.”
व्हिडिओ पाहून सराव
नीरजच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले आहेत. एक वेळ अशी आली, जेव्हा त्याला प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षक नव्हते. पण नीरज निराश झाला नाही. यूट्यूब चॅनलवर तज्ज्ञांच्या टिप्स पाहून तो मैदानात उतरला. व्हिडिओ पाहून स्वतःमधील त्रुटी दूर केल्या. जिथे शिकण्याची संधी मिळेल, तो ज्ञान आत्मसात करत होता. यावरूनच त्याची जिद्द आणि शिकण्याच्या उर्मीचे दर्शन झाले होते.
खोडकर नीरज
शेतकरी कुटुंबातील असल्याने नीरजचा खेळाशी तसा थेट संबंध नव्हता. संयुक्त कुटुंबात राहणारा नीरज लहानपणी खूपच गुटगुटीत होता. वजन कमी करण्यासाठी त्याचा खेळाशी संबंध आला. १३ वर्षांपर्यंत तो खूपच खोडकर होता. गावात कधी मधमाशांच्या पोळाशी खेळ, तर कधी म्हशींच्या शेपट्या ओढ. यासारख्या खोड्या तो करत होता. त्याला शिस्त लागावी यासाठी वडिलांना त्याच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती.
वजन कमी करण्याचे प्रयत्न
वजन कमी करण्यासाठी खूप समजावल्यानंतर नीरज धावण्यासाठी तयार झाला. गावापासून १५ किमी दूर पानिपतच्या शिवाजी स्टेडिअमवर नीरजला त्याचे काका घेऊन गेले. नीरजला धावण्यात काहीच रस नव्हता. पण तिथे काही खेळाडू भालाफेकीचा सराव करत असल्याचे त्याने पाहिले. त्याच वेळी तो भालाफेक खेळाच्या प्रेमात पडला आणि या खेळात येण्याचा निर्णय घेतला. आता विश्वविक्रम करणारा नीरज तुमच्यासमोर आहे.
…अन् नीरजला मार्ग दिसला
अनुभवी भालाफेक खेळाडू जयवीर चौधरी यांनी २०११ सालीच नीरजमधील प्रतिभेला ओळखले होते. चांगल्या सुविधांच्या शोधात नीरज पंचकुलामधील ताऊ देवीलाल स्टेडिअमवर आला. २०१२ च्या अखेर तो १६ वर्षांखालील स्पर्धेत राष्ट्रीय विजेता ठरला.
अनेक पदके नावावर
आतापर्यंतच्या प्रमुख स्पर्धांमध्ये नीरजने ६ सुवर्णपदकांसह एकूण सात पदके नावावर केली आहेत. जागतिक स्पर्धेला वगळल्यास नीरजने सगळ्या प्रमुख स्पर्धांमध्ये सुवर्णवेध घेतला आहे. ३२ खेळाडूंच्या पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात नीरजने बुधवारी ८६.६५ मीटरचा भालाफेक करून सर्वात वरच्या क्रमांकावर राहण्याचा मान मिळविला.
नीरजची कामगिरी (स्पर्धा, पदक आणि वर्ष)
ऑलिम्पिक – सुवर्णपदक – २०२१
आशियाई स्पर्धा – सुवर्णपदक – २०१८
राष्ट्रकुल स्पर्धा – सुवर्णपदक – २०१८
आशियाई स्पर्धा – सुवर्णपदक – २०१७
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा – सुवर्णपदक – २०१६
जागतिक कनिष्ठ स्पर्धा – सुवर्णपदक – २०१६
आशियाई कनिष्ठ स्पर्धा – रौप्यपदक – २०१६