मुंबई – ऑलिम्पिक स्पर्धा या कायम अचंबित करणाऱ्या घटनांनी गाजत असते. यंदाही अश्याच आगळ्यावेगळ्या गोष्टींसाठी ऑलिम्पिकची चर्चा होत आहे. दोन दिवसांपूर्वी खेळाडूंच्या पदक चावण्यावरून आंतरराष्ट्रीय चर्चा घडून आली आणि आता ऑस्ट्रेलियाच्या जेसिका फॉक्स या खेळाडूच्या एका विधानावरून ऑलिम्पिक चर्चेत आहे. जेसिकाने स्लोलमच्या दोन वेगवेगळ्या गटांमध्ये पदक पटकावले असून त्यासाठी तिने चक्क कंडोमचे आभार मानले आहेत.
आहे ना आश्चर्य! कुणी आपल्या गुरूला श्रेय देतो, कुणी आई-वडिलांना देतो तर कुणी आणखी कोणाला देतो. पण जेसिका फॉक्सने चक्क कंडोमचे आभार मानले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जेसिका फॉक्सने स्लोलम सी या खेळात दोन वेगवेगळ्या गटात कांस्य आणि सुवर्ण पदकावर मोहर उमटवली.
जेसिकाने पदक जिंकल्यानंतर एक व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला आहे. ज्यात ती अतिशय हळूवारपणे आपल्या कायाकवर (बोट वल्हविण्यासाठी लागणारी काठी किंवा दांडा) कंडोम चढविताना दिसत आहे. ‘कंडोमचा वापर कायाकला अधिक उत्तम करण्यासाठी देखील करता येतो, हे कुणाला माहिती नसेल,’ असे जेसिका व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
त्याचवेळी एक जण व्हेसलच्या समोर कार्बनचे मिश्रण लावताना दिसत आहे. त्यानंतर मिश्रण व्यवस्थित करण्यासाठी कंडोमचा वापर करत आहे. त्यावर जेसिका पुढे म्हणते, ‘कंडोममुळे कार्बन अधिक सॉफ्ट होते.’ दुसरीकडे ऑलिम्पिक आयोजन समितीने म्हटले आहे की, ऑलिम्पिक नगरीत कंडोम वाटण्यात आले आहेत, पण ते परिसरात वापरण्यासाठी नसून घरी वापरण्यासाठी आहेत. आयोजकांनी तब्बल ६० हजार कंडोम वितरित केले आहेत, हे विशेष.