इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोन्याच्या तस्करीविरुद्धच्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर १२.५६ कोटी रुपयांच्या परदेशी मूळच्या सोन्याच्या बार घेऊन जाणाऱ्या प्रसिध्द कन्नट आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री रान्या रावला यशस्वीरित्या अटक केली.
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, DRI अधिकाऱ्यांनी ३ मार्च २०२५ रोजी दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने बेंगळुरूला आलेल्या सुमारे ३३ वर्षांच्या प्रसिध्द रान्या रावला अटक केली. तपासणी केल्यानंतर, १४.२ किलो वजनाचे सोन्याचे बार हुशारीने लपवून ठेवलेले आढळले. सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार १२.५६ कोटी रुपयांचा हा अवैध माल जप्त करण्यात आला.
या कारवाईनंतर, DRI अधिकाऱ्यांनी बंगळुरूच्या लावेल रोड येथील तिच्या निवासस्थानाची झडती घेतली, जिथे ती तिच्या पतीसोबत राहते. झडतीत २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांचे भारतीय चलन जप्त करण्यात आले. १९६२ च्या सीमाशुल्क कायदा अंतर्गत संबंधित तरतुदींनुसार या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे आणि तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणात एकूण १७.२९ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत, जे संघटित सोन्याच्या तस्करी नेटवर्कला मोठा धक्का आहे. १४.२ किलो सोन्याची जप्ती ही अलिकडच्या काळात बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केलेल्या सर्वात मोठ्या सोन्यापैकी एक आहे.