मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. सुवर्णनगरी जळगावसह राज्याच्या अन्य शहरांमध्ये सोन्याचे दर ५८ हजारांच्याही वर पोहोचले आहेत. दर आवाक्याबाहेर गेल्याने सोने खरेदीस इच्छूक ग्राहकांनी वेट अँड वाचची भूमिका घेतली आहे. सोन्याचे वाढणाऱ्या दराचा ग्राहाकांवर परिणाम झाल्याने सराफा व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एकाच आठवड्यात सोन्याचे दरात हजार रुपयांची वाढ होऊन 57 हजार 500 रुपयांवरुन 58 हजार 500 रुपयांवर गेले आहेत. आतापर्यंतचा हा सोन्याच्या दराचा उच्चांक ठरला आहे. दोन वर्षांपूर्वी सोन्याचा दर हा 58 हजार 500 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. यावेळी मात्र त्यापेक्षा पाचशे रुपयांची वाढ जास्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने हे दर त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
दरवाढीचे प्रमुख कारण
सोन्याचे दर वाढण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. जागतिक पातळीवर सध्या वाढत असलेली महागाई आणि त्यानंतर आगामी काळात मंदीची लाट येण्याचा अंदाज पाहता, अनेक देशांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे आपला कल वाढवला आहे. त्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली आहे.
चांदीलाही लकाकी
जगात एकीकडे मंदीचे सावट आहे तर दुसरीकडे सोन्याचे दर दिवसेंदिवस वधारत आहेत. सध्या सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. लग्नसराईमुळे सोन्याची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाकाळात सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार रुपयांवर पोहोचले होते. आता प्रतितोळा 58 हजार 500 एवढा झाला आहे. सोन्यासह चांदीनेही चांगलाच भाव खाल्ला आहे. चांदीचा दर 69 हजार 167 रुपयांवर पोहोचला आहे.
ग्राहकांचा कल मोडीकडे
सोन्याच्या वाढत्या दरामुळे खरेदीचा कल कमी झाला आहे. या स्थितीचा फायदा घेण्यासाठी अनेक ग्राहकांनी सोने मोडण्याकडे आपला कल वळवल्याचे चित्र सध्या राज्यभरात दिसत आहे.
Gold Silver Rates Hike Above 58 Thousand Rs