मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईचा राक्षस केवळ भारतातच नव्हे तर जगभरात वाढत आहे. जागतिक स्तरावर वाढत असलेल्या महागाईने जगभरातील सरकार आणि केंद्रीय बँकांना विचार करायला भाग पाडले आहे. अमेरिकेतील महागाईने गेल्या चार दशकांचा विक्रम मोडला. तेथे महागाईचा दर 7.5 टक्क्यांवर पोहोचला. सततच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढत आहे.
विक्रमी महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात सोन्याचा भाव वाढला आहे, अशा परिस्थितीत तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळू शकतो. तसेच भारतात सोन्याच्या मागणीत गत वर्षांच्या तुलनेत चार टक्के वाढ होऊ न ती सुमारे 195 टनवर आली आहे. भारतात ही परिस्थिती असताना चीनमध्ये सोन्याची बिस्कीटे आणि नाणांच्या मागणीतील वाढ ही गत पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा वाढली आहे.
दागिन्यांच्या खरेदीत चार वर्षांत प्रथमच वाढ झाली असून ती सुमारे 670 टन झाली आहे. गतवर्षांच्या तुलनेत यात तीन टक्के वाढ झाली आहे. तेथील आर्थिक विकासाचे चित्र अधिक आशादायक राहण्याची स्थिती असताना चीनने घरांच्या किंमती आटोक्यात ठेवण्यासाठी उचलेल्या पावलांमुळे तेथील पैसा हा सोन्यातील गुंतवणुकीकडे वळला आहे. सोन्याच्या दरातील वाढीबाबत सकारात्मक अंदाज कायम आहे. दुसरीकडे भांडवली बाजार प्रमाणापेक्षा अधिक उंचावत असल्याने त्यात काही अंशी घसरण अपेक्षित आहे.
महागाईमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याचे कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणावादरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 95 डॉलरच्या वर गेले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढला तर कच्च्या तेलाचे दर आणि महागाई वाढेल. यामुळे सोन्याच्या किमती आणखी वाढतील.
विशेष म्हणजे रशिया-युक्रेनमधील युध्द आणि जागतिक राजकीय तणावात अनेक देश भरडल्या जात आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्याने अनेक अर्थव्यवस्थांचे कंबरडे मोडलं आहे. या अर्थव्यवस्था देशोधडीला लागल्या आहेत. श्रीलंकेचे ताजे उदाहरण जगासमोर आहे. त्यातच आता अमेरिकेच्या एका खेळीने सोन्याचे भाव ही आणखी गगनाला जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेने रशियाच्या सोन्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोन्याच्या किंमती भडकण्याची भीती जागतिक समुदाय व्यक्त करत आहे. युक्रेन वर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या विरोधात अमेरिका रशियावर विविध मार्गाने दबाव तयार करत आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अनेक निर्बंध रशियावर लादले आहेत. त्यात कच्चे तेल आणि गॅसवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्याचे दुष्परिणाम ही जग भोगत आहे. आता अमेरिका रशियातून निर्यात होणाऱ्या सोन्यावर ही बंदीची मोहर लावण्याची घोषणा करणार आहे.
विशेष म्हणजे जी 7 मध्ये जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समावेश आहे. अमेरिका आणि जी 7 देशांनी रशियातून सोने आयात करणा-यावर प्रतिबंध घातल्यावर सोन्याचा तुटवडा जाणवेल आणि सोन्याचे दर भडकतील. मंगळवारी जी 7 देशांची बैठक होत आहे. या बैठकीत रशियाच्या सोने निर्यातीवर बंदी घालण्यात येणार आहे. युक्रेनवरील हल्ल्याविरोधात रशियावर निर्बंध लादण्यात आले आहे. पण त्याचा उलट परिणाम जगभरातील अनेक देशांवर दिसत आहे. आपल्या देशातही इंधनाच्या किंमती त्यामुळे भडकल्या आहेत.
gold rates world situation inflation g7 countries investment