मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोने हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याने गुंतवणूकदारांना ७ टक्के परतावा दिला आहे. जरी सोन्याच्या किमतींमध्ये अनेक वेळा तीव्र चढ-उतार झाले असले तरी जागतिक चलनवाढ आणि वाढत्या व्याजदरांमध्ये सोने खरेदी गुंतवणूकदारांसाठी आणखी फायदेशीर ठरू शकते. येत्या काळात सोन्याच्या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून त्यामागे पाच कारणं सांगितली जात आहेत.
१. वाढती महागाई
भारतातील किरकोळ महागाई १४ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. तर, ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्येही महागाईने चार दशकांच्या तुलनेत उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या किमती वाढत्या महागाईच्या काळात कमी होण्याऐवजी तेजीत आहेत. कारण महागाईचा सामना करण्यासाठी सोने हा उत्तम गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो आहे. म्हणून आगामी काळात सोन्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.
२. व्याजदर वाढ
रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात ०.४० टक्के वाढ केली तर अमेरिका फेडरेशनने रेपो दरात ०.५० टक्के वाढ केली. याशिवाय ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकांनीही व्याजदरात वाढ केली आहे. महागाई रोखण्यासाठी व्याजदरात ही वाढ करण्यात आली आहे. व्याजदर वाढल्याने कर्जे महाग होत आहेत, त्यामुळे उद्योगाबरोबरच सर्वसामान्य माणूसही कर्ज घेणे आणि व्यवसाय वाढवणे टाळतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळेही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
३. डॉलर आणखी बळकट
सोन्याची जागतिक किंमत डॉलरमध्ये ठरवली जाते. कच्च्या तेलाच्या चढत्या किमती आणि वाढलेले व्याजदर यामुळे गुंतवणूकदार भारतासारख्या विकसनशील देशातून भांडवल काढून अमेरिकेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे डॉलरची मागणी वाढली आहे. डॉलरच्या बळकटीमुळेही सोन्याच्या किमतीत वाढ होण्यास वाव आहे.
४. जगाच्या पुरवठा साखळीत व्यत्यय
चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसमुळे अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. यामुळे जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. वाहन उद्योग ते ग्राहकोपयोगी वस्तूंसह अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आर्थिक मंदीची भीती पुन्हा बळावली आहे. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते.
५. रशिया-युक्रेनमध्ये प्रदीर्घ युद्ध
जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेचे प्रमुख कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध. हे युद्ध मोठा काळ सुरु असल्याने तर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. हे संकटही सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ होण्यास कारणीभूत आहे. ही पाच कारणे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्यामागे सांगितली जात आहे.