मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सणासुदीच्या काळात सोनेखरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काहीशी निराशाजनक माहिती समोर आले आहे. कारण सराफा बाजारात कामकाजाच्या गेल्या ५ सत्रांमध्ये सोने प्रति १० ग्रॅम सुमारे १८०० रुपयांनी महागले असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे सोने खरेदी करु इच्छिणाऱ्यांच्या खिशाला मोठी झळ पोहोचणार आहे.
असे आहेत सोने-चांदीचे दर
आयबीजेएवर दिलेल्या ताज्या दरांनुसार मंगळवारी सोन्याच्या भावात ८९९ रुपयांची वाढ झाल्याचे बघायला मिळाले. तर चांदीचा स्पॉट भाव ३७१७ रुपयांनी वाढून ६१ हजार ०३४ रुपये प्रति किलोपर्यंत गेला. मंगळवारी सकाळी सोन्याचा भाव ७८२ रुपयांनी महागला आणि तो ५१ हजार १६९ रुपयांवर उडाला. तर चांदी ३८२७ रुपयांनी महाग होऊन ६१ हजार १४४ रुपयांवर उघडली. मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१ हजार २८६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. मागील पाच व्यापार सत्रांमध्ये सोने १८०१ रुपयांनी महागले असून ४९ हजार ३६८ रुपयांवरुन ५१ हजार १६९ रुपयांवर पोहोचला आहे.
तज्ज्ञ म्हणतात
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “सोन्याच्या किंमती आर्थिक वाढ, महागाई, डॉलर निर्देशांक आणि उच्च रोखे उत्पन्न यावर अवलंबून असतात. सणासुदीचा सोन्याच्या दरावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.” तर सुवर्ण अभ्यासक म्हणतात की, “अमेरिकन सिक्युरिटिजच्या उत्पन्नामुळे आणि डॉलरच्या निर्देशांकात सतत घसरण झाल्याने कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याचा भाव वाढला.”
कमोडिटी रिसर्च तज्ज्ञ यांच्या मते “काही दिवसांपूर्वी फेडची आक्रमक व्याजदराची भूमिका, डॉलरमधील अस्थिरता आणि रोखे उत्पन्नातील अस्थिरता यामुळे सोन्याच्या खरेदीत नकारात्मकता आली होती. आता देशांतर्गत आघाडीवर, सर्वसाधारणपणे सण आणि लग्नाच्या काळात सोन्याची मागणी वाढत आहे.”
Gold Rates Increased Dasara Diwali Festival