विशेष प्रतिनिधी, मुंबई
सध्या देशांतर्गत मागणी घटल्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. पण हे फार दिवस चालणार नाही. लवकरच सोन्याचे भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांना लवकरच सोन्याचे दिवस येतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सोन्याचे भाव घसरण्याला आंतरराष्ट्रीय कारणे आहेत, तशी देशांतर्गत कारणेही आहेत. साधारणपणे जुलैमध्ये सोन्याची मागणी कमी असते. कारण या दिवसांमध्ये विवाह सोहळ्यांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मागणी वाढावी यासाठी सराफा व्यापारी मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देत आहेत. परिणामी सोन्याचे भावही घसरले आहेत. त्याचवेळी डेल्टा प्लसने सर्वांची झोप उडवली आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटांप्रमाणे वाताहत होण्याचे संकेत दिले जात आहेत. अशात ग्राहका गुंतवणुकीसाठी सोने खरेदीचा मार्ग निवडू शकतात. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढू शकतात, असे तज्ज्ञांना वाटत आहे.
सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे भाव जोपर्यंत कमी आहेत, तोपर्यंत गुंतवणुकीची उत्तम संधी आहे. सध्या सोन्याच्या किंमती ४६ हजार ५०० ते ४५ हजार १०० रुपये प्रती दहा ग्रॅम आहे. दिवाळीपर्यंत हे भाव ५२ हजार रुपये प्रती दहा ग्रॅम होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांना सोन्याचे दिवस येतील, यात शंका नाही.
नऊ हजाराने स्वस्त
ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचे भाव ५६ हजार रुपयांच्या पार गेले होते. मात्र सध्या ४७ हजारापेक्षाही कमी आहेत. तब्बल नऊ हजारांनी सोने स्वस्त झाले आहेत. गेल्यावर्षी सोन्याने २८ टक्के रिटर्न दिले होते. यावर्षी गुंतवणूकदारांना निराश केले असले तरीही दिवाळीपर्यंत चांगले रिटर्न्स मिळतील, अशी आशा आहे.