मुंबई – सोने खरेदी हा भारतातील जवळपास प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सोन्याचे दागिने असो की, चोख सोने याबद्दल सर्वांनाच आकर्षण असते. केंद्र सरकार आता देशातील जनतेला स्वस्त दरात वेगळ्या प्रकारे सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. सार्वभौम गोल्ड बाँड ( रोखे ) योजनेअंतर्गत गुंतवणूकदार १० ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून बाजार किंमतीपेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करू शकता.
सदर योजना फक्त पाच दिवसांसाठी म्हणजेच १० ते १३ ऑगस्ट पर्यंत सर्वांसाठी खुली आहे. आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या विक्रीवरील नफ्याला आयकर नियमांनुसार सूटसह आणखी बरेच फायदे मिळतील. सरकारकडून गोल्ड बॉण्ड्समध्ये गुंतवणुकीसाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षाची ही पाचवी मालिका आहे. या संदर्भात अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सार्वभौम सुवर्ण रोखे मे ते सप्टेंबर दरम्यान सहा हप्त्यांमध्ये जारी केले जातील. या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या योजनेअंतर्गत प्रति ग्रॅम ४७९० रुपयांना सोने खरेदी करू शकता. म्हणजेच, १० ग्रॅम सोने खरेदी केले, तर त्याची किंमत ४७,९०० रुपये आहे आणि गोल्ड बॉण्ड्सची खरेदी ऑनलाइन केली जाते, तर सरकार अशा गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपये अतिरिक्त सूट देते. यामध्ये, अर्जांचे पेमेंट ‘डिजिटल मोड’ द्वारे करावे लागते.
ऑनलाइन सोने खरेदी केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम सोन्यासाठी ४७४०रुपये मोजावे लागतील. १० ग्रॅम सोने ४७४०० रुपयांना मिळेल. गोल्ड बॉण्ड्सचा मॅच्युरिटी (परिपक्वता ) कालावधी आठ वर्षांचा असतो. तसेच त्यावर दरवर्षी २.५ टक्के व्याज मिळते. या बॉण्डवर मिळणारे व्याज गुंतवणूकदाराच्या टॅक्स स्लॅबनुसार करपात्र आहे, परंतु त्यावर कोणतेही कर वजावट (टिडीएस) लागणार नाही.