विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्र सरकारने सोन्याचे दागिणे आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग १६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था अनिवार्य करण्यासाठी पूर्वी १५ जानेवारीचा मुहूर्त निघाला होता. मात्र आता एक दिवस आणखी वाढवला आहे. याचाच अर्थ आता दागिण्यांच्या व्यापाऱ्यांना १५ जूननंतर १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिणेच विकण्याची परवानगी असेल.
बीआयएस एप्रिल २००० पासून सोन्याच्या दागिण्यांसाठी हॉलमार्किंगची योजना राबवत आहे. सध्या जवळपास ४० टक्के दागिण्यांचे हॉलमार्किंग होत आहे. हॉलमार्किंगमुळे कायद्यात ग्राहकांचे हित सुरक्षित राहील. कुठलाच व्यापारी ग्राहकांची फसवणुक करू शकणार नाही आणि सोन्याच्या शुद्धतेवर थर्ड पार्टीची गॅरेंटी असणार आहे.
हॉलमार्किंगमुळे घरात ठेवलेल्या सोन्याला काहीच फरक पडणार नाही. ग्राहक जुने दागिणे कधीही विकू शकणार आहे. कारण हॉलमार्किंग ही सोनारांसाठी केलेली अनिवार्यता आहे. त्याला हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही.
हॉलमार्क केलेल्या दागिण्यांवर वेगवेगळ्या खुणा असतील. मॅग्नीफायींग ग्लासमधून बघितले तर दागिण्यांवर पाच खुणा दिसतील. यात बीआयएस लोगो, सोन्याची शुद्धता सांगणारा नंबर (२२ कॅरेट किंवा ९१६), हॉलमार्किंग सेंटरचा लोगो, मार्किंगचे वर्ष आणि दागिण्याचे आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे.
२०१९ मध्ये आदेश
नोव्हेंबर २०१९ मध्ये सरकारने सोन्याचे दागिणे आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग १५ जानेवारी २०२१ पासून अनिवार्य असेल अशी घोषणा केली होती. पण व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर जूनपर्यंत मुदत वाढवून दिली.