मुंबई – कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासह महागाईच्या वाढत्या जोखिमेमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोन्याकडे आकर्षित होत आहेत. आगामी काळात सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोचण्याची शक्यता आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ कसा फायदेशीर आहे याबद्दल जाणून घेऊयात.
गुंतवणूक सल्लागारांचे मत आहे की, कोरोनावर नियंत्रण मिळविल्यामुळे भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेने वेग पकडला आहे. सोबतच महागाईचे आव्हान कायम आहे. अमेरिकेत किरकोळ महागाई दर ३० वर्षांत सर्वाधिक नोंदविला गेला आहे. तर भारतात ५ ते ६ टक्क्यांच्या आसपास रेंगाळत आहे.
सोन्याद्वारे मिळेल चांगला परतावा
दुसरीकडे आरबीआयचा रेपो रेट आता चार टक्क्यांसह वीस वर्षांच्या खालच्या स्तरावर पोचला आहे. मार्च महिन्यानंतर रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्ज महागण्याची शक्यता आहे. महागाईचा दर असाच वाढत राहिला तर सोन्यावर निश्चितच लाभ मिळेल. यामुळे २०२२ च्या पहिल्या सहामाहीत (जुलैपर्यंत) सोन्याचा भाव पुन्हा एकदा विक्रमी पातळी पार करून ५५ -५६ हजार रुपये प्रती १० ग्रॅम असा होण्याची शक्यता आहे. एकूणच २०२२ मध्ये सोन्यातून १२-१५ टक्के परतावा मिळू शकतो.
भाव कोसळले तर…
लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे सहाजिकच यापुढे सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. तरीही जर अर्थव्यवस्था सुधारण्याचा वेग वाढला आणि बाजारात नव्या संधी निर्माण झाल्या तर सोन्याच्या भावात घसरणही येऊ शकते. गुंतवणूकदारांना सोन्यातून जास्त परतावा देणार्या इक्विटीचा पर्याय मिळेल. त्यामुळे येथील पैसा शेअर बाजारात जाऊ शकतो. परिणामी सोन्याचा सध्याचा भाव ४८ हजारांवरून ४२ हजार रुपये प्रतिग्रॅम होऊ शकतो. २०२२ च्या मध्यापर्यंत ही घसरण होण्याची शक्यता आहे.
खरेदीत मोडणार पाच वर्षांचा विक्रम
गुंतवणूकदारांसाठी गेले काही वर्षे खूपच आव्हानात्मक होती. नोटबंदी, जीएसटी, सोन्यावरील आयात शुल्क वाढणे आणि कोरोना महामारीमुळे खरेदीवर लगाम लागलेला होता. येत्या वर्षात सोन्याची मागणी गेल्या पाच वर्षात सर्वाधिक राहणार आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात सोन्याची २.५४ लाख कोटी रुपयांची आयात होत आहे. २०१२-१३ नंतर ही आयात सर्वाधिक होती. २०२१-२२ मध्ये सोन्याच्या आयातीचा हा विक्रमही मोडण्याची शक्यता आहे.
किमती वाढण्याचे पाच प्रमुख कारणे
१) डॉलरमध्ये घसरण – आंतरराष्ट्रीय बाजारात युरो, पौंडच्या तुलनेत डॉलरच्या किमतीत घसरण होत आहे.
२) महागाई – युरोप, अमेरिका आणि भारतासह सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांनी महागाई वाढण्याची चिंता व्यक्त केली आहे.
३) कोरोना संसर्ग – ब्रिटन, युरोप, रशिया आणि चीनसारख्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे सोन्याला लाभ मिळू शकतो.
४) भू राजकीय तणाव – अमेरिका, अफगाणिस्तान, चीन आणि मध्यपूर्व देशांमध्ये भू राजकीय तणाव वाढल्यामुळे बाजारात अनिश्चितता आली आहे.
५) रुपयामध्ये घसरण – भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ७४.२४ वर आहे. घसरण होऊन तो ७६ रुपयांपर्यंत जाऊ शकतो.