इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय नागरिकांना विशेषतः महिलांना सोने खरेदीचे प्रचंड आकर्षण असते, केवळ लग्नसराई व सणासुदीच्या काळात नव्हे तर अन्य काही कारणास्तव गेल्या अनेक वर्षांपासून भारतात सोने खरेदीची प्रथा परंपरा आहे. केवळ हौस म्हणून नव्हे तर गुंतवणूक म्हणून देखील सोने खरेदी केले जाते. परंतु यापुढे आपण सोने खरेदी ही गुंतवणूक म्हणून करणार असाल तर त्याबाबत विचार करावा लागणार आहे. कारण याबाबत केंद्र सरकार वेगळा कर लावण्याच्या विचारत आहे, असे म्हटले जाते.
सोन्यात गुंतवणुकीचे सर्वसाधारण अनेक फायदे आहेत. सोन्यात पैसा टाकण्याची दोन कारणे आहेत. एक सोन्यात गुंतलेला पैसा हा महागाईपासून संरक्षित केला जातो. त्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीतून मिळालेला परतावा हा त्या दरम्यानच्या काळातील वाढत गेलेल्या महागाई दराच्या काहीसा वरचढ असतो. तसेच अडीअडचणीच्या काळासाठीची तजवीज म्हणून साेने खरेदीची परंपरा आहे. मात्र, या गुंतवणुकीतून हाेणाऱ्या लाभावर आता सरकारचा डाेळा आहे.
साेने व इतर काही मालमत्तेतील गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स लावण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. कारण केंद्र सरकारकडून कॅपिटल गेन टॅक्सच्या दरांबाबत लवकरच निर्णय हाेण्याची शक्यता आहे. येत्या अर्थसंकल्पात कॅपिटल गेन टॅक्सच्या रचनेत सरकार बदल करण्याचा विचार करत असून महसूलवाढ तसेच विविध याेजनांवरील खर्च वाढविण्यासाठी हा बदल केला जाऊ शकताे. तसेच भांडवल लाभ कर हा भांडवली नफा किंवा कंपनी किंवा व्यक्तीने त्यांच्या मालमत्तेच्या विक्रीवर मिळवलेल्या नफ्यावर लागू केलेला कर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती विक्री करते आणि हातात रोख रक्कम मिळते तेव्हा हा कर लागू होतो.
खरे म्हणजे सोने गुंतवणुकीचा परिणाम हा शेअर बाजारातील समभागांतील गुंतवणुकीच्या व्यस्त स्वरूपात असते.सन २००७ पासून शेअर गुंतवणुकीची कामगिरी चढउतारची राहिली आहे, त्याच काळात सोन्याला झळाळी चढल्याचे दिसून आले. त्यामुळे गुंतवणूक प्रकारात सोन्याचाही समावेश करण्याकडे ग्राहकांचा कल असून बाजारातील चढ-उतारांच्या जोखीमेपासून बचाव करणे शक्य बनले आहे.
महत्वाचे म्हणजे सोन्यातील गुंतवणुकीची सन २००६ ते २०११ दरम्यान बहारदार कामगिरी राहिली आहे. या काळात सोन्याने प्रति वर्ष २९ टक्के दराने परतावा दिला आहे. हा परतावा दर त्या काळात अन्य कोणत्याही गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत निश्चितच सरस होता. सोन्यात गुंतवणुकीचा पारंपरिक कल हा सोन्याचे दागिने खरेदीकडेच असतो. प्रसंगी सोन्याची वेढा (वळी), नाणी व चिपा खरेदी केल्या जातात. परंतु या पद्धतीच्या काही उणीवा देखील आहेत. गरज असेल तेव्हा हे सोने मोडायचे झाल्यास, त्यावेळच्या बाजारभावापेक्षा सोन्याच्या वजनाप्रमाणे थोडे कमी पैसे मिळतात.
Gold Investment Alert Union Government Big Decision