मनीष कुलकर्णी, मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
तुम्हाला लग्नसराईत स्वस्त सोने खरेदी करण्याची इच्छा आहे का? असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्र सरकारच्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेअंतर्गत एकदा पुन्हा सोन्याची विक्री करण्यात येणार आहे. ही प्रत्यक्ष सोन्याची नसून, बॉन्डची विक्री असेल.
किंमत काय
दरवेळेप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ च्या नव्या सीरिजसाठी गोल्ड बॉन्डची किंमत ४,७८६ रुपये प्रतिग्रॅम निश्चित केली आहे. १० ग्रॅमच्या बॉन्डच्या खरेदीसाठी ४७.८६० रुपये खर्च करावे लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज करणार्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणार्या गुंतवणूकदारांना ५० रुपये प्रतिग्रॅमची सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांना हा बॉन्ड ४७३६ रुपये प्रतिग्रॅम या भावाने मिळेल. अशा गुंतवणूकारांची प्रति १० ग्रॅमवर ५०० रुपयांची बचत होणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही १० ते १४ जानेवारीपर्यंत गोल्ड बॉन्डची खरेदी करू शकणार आहात. या बॉन्डसाठी ४,७८६ रुपये प्रतिग्रॅम अशी जारी किंमत निश्चित करण्यात आली आहे.
कसे खरेदी कराल
बँका, भारतीय स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, डाकघर, एनएसई आणि बीएसईच्या माध्यमातून हे बॉन्ड विक्री करता येतील. सोन्याची भौतिक मागणी करण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम गोल्ड बॉन्ड योजना नोव्हेंबर २०१५ रोजी लागू करण्यात आली होती. यामध्ये तुम्ही एक ते चार किलोपर्यंत खरेदी करू शकणार आहात. यासाठी सरकारकडून २.५ टक्के वार्षिक व्याज देणार आहे.
सध्याची किंमत
सराफा बाजारात शनिवारी सोने ३०१ रुपयांनी कमी होऊन ४६,४१५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. मागील व्यावसायिक सत्रात सोने ४६,७१६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते.