मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई सेंट्रल परिसरात तस्करी केलेले सोने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणाऱ्या तीन जणांना, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे पकडले. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता विविध स्वरुपात (वितळलेल्या सोन्याच्या पट्ट्या, अंडाकृती कॅप्सूल, पट्ट्या, साखळी) तस्करी केलेले २२.८९ किलो सोने जप्त करण्यात आले.
तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेले ४० लाख रुपये एका घरात लपवून ठेवण्यात आले होते, त्याची झडती घेण्यात आली आणि संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली.
एकूण १६ कोटी ९१ लाख रुपये किंमतीचे २२.८९ किलो सोने आणि तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेले भारतीय चलनातील ४० लाख रुपये सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदीनुसार जप्त करण्यात आले तसेच सर्व ३ जणांना अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.