विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सोने आणि सोन्याचे दागिने याबद्दल सर्वांनाच आकर्षण वाटत असते. विशेषत : महिलावर्गाला सोन्याच्या दागिन्याची खूप हौस असते. त्यामुळे सहाजिकच अनेक जण दरवर्षी कोणत्या तरी शुभमुहूर्ताला थोडेफार तरी आपल्या ऐपतीप्रमाणे सोने खरेदी करत असतात. गेल्या ४०ते ५० वर्षांचा आढावा घेतला तर सोन्याचे दर हे सतत वाढत असल्याचे दिसून येते. गेल्या दहा पंधरा वर्षात तर सोन्याचे भाव दुप्पट-तिप्पट झालेली दिसतात. आणखी वर्षभरात सोन्याचे भाव आणखी वाढतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यंदा सोन्याच्या किमतीत अस्थिरता दिसून आली. विशेषतः अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपासून सोन्याच्या किंमतीबाबत अनिश्चितता आहे. मात्र, २०२१ च्या सुरुवातीला सोन्याची सुरुवात चांगली झाली. परंतु यामध्ये अनिश्चितता आणि भीती असूनही, अजूनही लोकांच्या अपेक्षा चांगल्या आहेत. दुसरीकडे, गुंतवणूक आणि औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीला देखील भक्कम आधार मिळाला आहे. जगभरात आर्थिक आणि वित्तीय धोरणांचा विस्तार केल्यामुळे चांदीला फायदा होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी इलेक्ट्रॉनिक वाहने, ५ जी आयटी, सौर पॅनेल इत्यादींमध्ये स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे चांदीलाही फायदा होऊ शकतो.
याशिवाय अमेरिकन सिनेटने देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी १ ट्रिलियन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. उद्योगांना त्याचा फायदा होईल. सहाजिकच ज्याचा परिणाम चांदीच्या किंमतींवर होईल. जागतिक पातळीवर देखील चांदीचा वापर वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, भारताच्या देशांतर्गत बाजाराबद्दल विचार केला तर मोतीलाल ओसवाल फायनान्स सर्व्हिसेसचे कमोडिटी अँड करन्सी उपाध्यक्ष, नवीन दामानी म्हणतात की, देशांतर्गत सोन्याचे भाव सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत खूप वेगाने वाढतील त्याचबरोबर येत्या १२ ते १५ महिन्यांत ते ५६,५०० च्या पुढेही पोहोचू शकतात. त्याच वेळी, चांदीबद्दल असे म्हटले जाते की, अलीकडच्या काळात त्यात चांगली वसुली झाली आहे. नजीकच्या भविष्यात ती आणखी ७०, २०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. पण जर किंमतीत घट झाली तर चांदीची किंमत ५५,००० रुपयांपर्यंत येऊ शकते. चांदी एक बेस मेटल असून किंमत धातू आहे, ज्याचा फायदा किमतींमध्ये दिसून येईल. यंदा परताव्याच्या बाबतीत चांदीने सोन्याला मागे टाकले आहे.