विशेष प्रतिनिधी, नाशिक
काँक्रीटचा विळखा काढून गोदावरी नदीला पुनर्जिवन देण्याचा लढा आता जागतिक पातळीवर गेला आहे. काँक्रीट काढल्याने गोदावरीचे मूळ जलस्त्रोत पुन्हा सक्रीय झाले आहे. त्यामुळे नदी कायमस्वरुपी प्रवाहित होण्यात मदत झाली आहे. ही यशकथा आता लंडनच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात दाखविण्यात येत आहे. जगप्रसिद्ध लंडन डिझाईन बिनाले या प्रदर्शनात गोदावरी पुनर्जिवन प्रकल्पाचा समावेश करुन जगभरात त्याची किर्ती पोहचविली जात आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
लंडन डिझाईन बिनाले प्रदर्शन
सर जॉन सोरेल आणि बेनेई लान्स यांनी २०१६ मध्ये लंडन डिझाईन बिनाले या प्रदर्शनाची मुहुर्तमेढ रोवली. आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाईनच्या माध्यमातून विविध प्रश्नांना उत्तरे शोधण्यासंबंधित एक व्यासपीठ तयार केले. या वर्षी आर्टीस्टिक डायरेक्टर एस. डेव्हलीन यांनी या प्रदर्शनाचे संकलन केले आहे.
यंदाचे प्रदर्शन
यंदाचे प्रदर्शन हे १० जून रोजी सुरू झाले आहे. ते येत्या २७ जून पर्यंत सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन ऑनलाईनरित्या सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या वर्षीचे प्रदर्शन “रेझोनन्स अनुवाद” या संकल्पनेवर आधारित आहे. जगभरातून अशा कल्पना आणि प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे की, ज्यांच्यामुळे मुलभूत बद्दल घडू शकतो आणि ज्यांचे अनुकरण केल्यामुळे विविध प्रश्नांना उत्तरे मिळू शकतात.










