नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे गोदावरी गौरव पुरस्कारांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा १० मार्च २०२० चा गोदावरी गौरव पुरस्कार कोरोनाच्या परिस्थितीमुळे आणि निर्बंधांमुळे होऊ शकला नाही. आता हा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक या फेसबुक पेज वरून ऑनलाइन होणार आहे. रविवार दिनांक २५ जुलै रोजी सायंकाळी, ६ वा. होणाऱ्या या कार्यक्रमात, श्रीगौरी सावंत (लोकसेवा), डॉक्टर माधव गाडगीळ (विज्ञान), भगवान रामपुरे (शिल्प), दर्शना जव्हेरी (नृत्य), सई परांजपे (चित्रपट) आणि काका पवार (क्रीडा) यांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी सांगितले की, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा एक वर्षाआड मोठ्या उत्साहाने पार पडत असतो. महाराष्ट्राच्या अनेक भागातून तसेच नाशिक शहरातून रसिक मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाला हजेरी लावतात. तसेच विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचे मानदंड उभे करणाऱ्या आणि समाजाला समृद्ध करणाऱ्या या पुरस्कार प्राप्त महानुभावांचे मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक असतात. परंतु गेल्या वर्षी कोरोना च्या निर्बंधांमुळे हा कार्यक्रम वेळेत होऊ शकला नाही, हा कार्यक्रम निर्बन्ध शिथिल झाल्यानंतर परंपरेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर व्हावा असेच प्रतिष्ठानला वाटत होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी तसे निर्देशही दिले होते. त्याप्रमाणे कार्यक्रमाची तयारी ही करण्यात आली होती, परंतु नजीकचा काळ लक्षात घेता असा सोहळा प्रत्यक्ष आयोजित करणे शक्य होईल असे वाटत नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आणि अशीच भावना पुरस्कारार्थीनीही व्यक्त केली आहे.