नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी नियोजन करुन या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पीओपी गणेशमुर्ती ऐवजी पर्यावरणपूरक गणेशाच्या मुर्तीची स्थापन करावी, असा संदेश नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी जनजागृती करावी, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीच्या बैठकीत सांगितले.
गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे बोलत होते. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मुख्य अभियंता निर्मिती औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे सुनिल पाटील, उपायुक्त (करमणूक शुल्क) कुंदनकुमार सोनवणे,शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त व्ही.एम.मुंडे, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता शिवकुमार वंजारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळ, नाशिक सहायक पोलीस निरीक्षक जी.आर.परचुरे, प्रा.डॉ. प्राजक्ता बस्ते, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, येत्या गणेशोत्सवात नागरिक पर्यावरणपूरक गणपती घेण्यावर भर देतील यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात येवून जनजागृती करावी. तसेच निर्माल्य विर्सजित करतांना प्रदूषण होणार नाही यासाठी उपायोजना कराव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिल्या आहेत.
गोदावरी नदीचे नागरिकांकडून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी चार पोलीस उपनिरीक्षक आणि तीस कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीसोबत नियुक्त कर्मचाऱ्याचे संपर्क क्रमांकही नमूद करण्यात यावे, असेही श्री.गमे यांनी बैठकीत सांगितले. भुजलसाठा वाढविण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असेही श्री.गमे यांनी सांगितले.
गोदावरी संवर्धनाबाबत तयार करण्यात आलेले संकेतस्थळ अद्यावत ठेवण्यात यावे. संकेतस्थळावर नोंदविल्या जाणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी. महानगरपालिकेने गोदावरी संवर्धन कक्ष कार्यान्वित केला असूल कक्षामार्फत गोदावरी संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच गोदावरी नदीपात्रालगत तसेच पुलांवर पुजेच्या वस्तु, पुजेचे साहित्य व निर्माल्य टाकण्याकरिता निर्माल्य कलश बसविण्यात आले असून तेही वेळच्यावेळी रिकामे करण्यात यावे. केरळच्या धर्तीवर या पाणवेलींचा पुनर्वापर करण्याबाबतही केरळच्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात यावा, असेही श्री.गमे यांनी यावेळी सांगितले.
Godavari Pollution Control Committee Meeting Decisions