नाशिक – गोदावरी गौरव २०२० पुरस्काराने सन्मानित सर्व गौरवमूर्तींनी जीवनाचा आनंद घेणारा मार्ग निवडला आहे आणि आपल्या अमूल्य योगदानाने समाज जीवन समृद्ध केले आहे. या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो असे गौरव उद्गार कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात काढले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गोदावरी गौरव पुरस्कार २०२० या कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. कोविडच्या निर्बंधांमुळे आणि पुढील अनिश्चिततेमुळे सर्व गौरवमूर्तींनी ऑनलाइन येऊन हा पुरस्कार स्वीकारला आणि आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रक्षेपण कुसुमाग्रज स्मारकातून करण्यात आले.
या कार्यक्रमात गौरी सावंत (लोकसेवा) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कुसुमाग्रजांबद्ल गौरव उद्गार काढले तसेच त्यांच्या कवितेमुळे मला कार्य करण्यास स्फूर्ती मिळाली. माझ्या बरोबर असलेले इतर पुरस्कारार्थी सूर्याप्रमाणे तेजस्वी असून मी मात्र काजव्यासारखी आहे. त्यांच्या बरोबर मला मिळालेला पुरस्कार अत्यंत मोलाचा वाटतो. ट्रान्सजेंडर स्विकारण्याची ताकद समाजामध्ये आली पाहिजे यासाठी असलेल्या माझ्या कार्याला या पुरस्कारामुळे प्रोत्साहन मिळाले आहे. विज्ञान क्षेत्रातील गौरवार्थी डॉक्टर माधव गाडगीळ म्हणाले की, कुसुमाग्रजांच्या कवितेतून स्फूर्ती घेऊन मी कार्य करत राहिलो. कुसुमाग्रजांच्या कवितेतील निसर्गाच्या अविष्कारातुन आनंदाची अनुभूती मिळते. कायमच मी कुसुमाग्रजांच्या कविता गुणगुणत असतो आणि पर्यावरण विषयक आपल्या कार्यातील अनुभव कथन केले.
प्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे म्हणाले की, कुसुमाग्रजांचे नटसम्राट नाटक माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. शालेय जीवनात असतांना मी या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकाच्या नावाने असलेल्या प्रतिष्ठानकडून मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझा फार मोठा सन्मान आहे. प्रसिद्ध नृत्यांगना आणि गुरु पद्मश्री दर्शना जव्हेरी – माझ्या नृत्य क्षेत्रातील कार्याबद्दल महान लेखकाच्या कल्पनेतून साकारलेला गोदावरी गौरव पुरस्कार मला अत्यंत मोलाचा असून माझ्या कार्याची दखल नाशिकमधून घेतली याचा आम्हा जव्हेरी सिस्टर्सना विशेष आनंद आहे. माझ्या कार्यासाठी मी माझे गुरु पालक आणि कुटुंबीय यांचे ऋण व्यक्त करते.
सई परांजपे यांनी कुसुमाग्रजांची अनेक श्रद्धास्थाने होती. परंतु त्यांच्या देव्हाऱ्यात राम गणेश गडकरी यांना विशेष स्थान होते. कुसुमाग्रजांना मिळालेल्या अनेक पुरस्कारातील राम गणेश गडकरी यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचा विशेष अभिमान होता, तेवढाच अभिमान मला आज वाटत आहे. मराठी भाषेच्या ऱ्हासाला आपण सर्वच जबाबदार आहोत. रोजच मराठी भाषा दिन साजरा करून आपण मराठीला पुन्हा उर्जित अवस्था प्राप्त करून देऊ. माझा कला प्रवास ही एक आंनद यात्रा आहे असे सांगितले. तर अनेक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू घडविणारे काका पवार यांनी कुस्ती या रांगड्या खेळाचा गौरव प्रतिष्ठानने केला आहे आणि कुस्तीला न्याय दिला आहे. त्याबद्दल प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले. यावेळी कोकण आणि कोल्हापूर विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या हानीबद्दल संवेदना प्रकट करण्यात आल्या. त्याचप्रमाणे कविवर्य वसंत बापट यांना जन्मशताब्दी निमित्त अभिवादन करण्यात आले आणि प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. पुरस्काराथींचा परिचय अॅडव्होकेट राजेंद्र डोखळे आणि शिल्पा देशमुख यांनी केला, तर निवेदन आणि आभार प्रदर्शनही शिल्पा देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य फेदरटच स्टुडिओचे होते.