नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदावरी संवर्धन व स्वच्छतेसाठी नाशिककरांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, असे आवाहन नाशिकच्या पर्यावरण प्रेमींनी केले आहे. गोदावरी स्वच्छता व संवर्धनासाठी नाशिकच्या पर्यावरण प्रेमींची बैठक नुकतीच शंकराचार्य संकुलात पार पडली.
या बैठकीस नमामि गोदा फाऊंडेशनचे राजेश पंडित, श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, मुकुंद खोचे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे चिराग पाटील,इस्कॉनचे नरसिंहकृपा प्रभुजी,देवांग जानी, टीम नाशिक प्लॉगर्स अंबरीश मोरे, शेखर गायकवाड, स्नेहल देव यांच्यासह पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
श्री शंकराचार्य न्यास संकुल येथे पार पडलेल्या बैठकीत गोदावरी स्वच्छता व गोदा संवर्धन या प्रमुख विषयांवर मंथन करण्यात आले. या बैठकीत गोदावरी विषयक विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात अविरल गोदा, निर्मल गोदा आणि समाजाची गोदावरी नदी विषयक माता म्हणून भाव जागृती अशा तत्त्वांवर चर्चा झाली.
या बैठकीत सर्व पर्यावरण प्रेमींनी गोदावरी संवर्धन व स्वच्छतेसाठी सर्व नाशिककरांचा सहभाग अतिशय आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडले. तसेच आगामी काळात नाशिक करांच्या सहभागातून गोदावरी स्वच्छता व संवर्धन करण्यासाठी काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.