नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदावरीत पुलावरुन उडी मारल्यामुळे पाण्यात बुडणा-या व्यक्तीला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने वाचवले आहे. मालेगाव स्टँड पोलिस चौकी हद्दीत असलेल्या व्हिक्टोरीया पुलावरुन ही उडी इंदिरानगर येथील सलुन व्यावसायिक राजेंद्र रमेश पगारे (३८) यांनी मारली होती. ही बातमी एपीआय पडोलकर यांना मिळाल्यानंतर ते कर्मचा-यांसह या ठिकाणी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पुलावरून दोर टाकले. तर दोन लोकांनी पाण्यात उडी मारली. त्यानंतर पगारे यांना १०० मिटर पाण्यात पोहून या दोघांनी वाचवले. अवघ्या काही मिनिटात घडलेल्या या थरारक घटनेत स्थानिकांनी व पोलिसांनी दाखवलेले धैर्यामुळे पगारे यांचा जीव वाचला. पगारे यांनी ही उडी का मारली या प्रश्नांचे उत्तर मात्र समोर आले नाही. पण, या घटनेनंतर पोलिसांनी पगारे यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द केले.