नाशिक – आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन करुन या मोहिमेत नागरिकांना देखील सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीच्या बैठकीत केले आहे. गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीची आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे बोलत होते. यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य उपायुक्त दत्तात्रय बोरुडे, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता शिवकुमार वंजारी, जयवंत बोरसे, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात ग्रामीण भागातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एक गाव एक गणपती मोहिम राबविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच गणेशोत्सव काळात गणपती विर्सजन पर्यावरणपूरक पध्दतीने कसे होईल यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त गमे यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे कामांची माहिती घेवून सांडपाणी व्यवस्थापनाबाबत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या जनजागृतीच्या कामाबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समाधान व्यक्त केले. एमआयडीसी, नदीपात्रातील रासायनिक प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभाग आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कंपन्यांना भेट देवून सांडपाण्याच्या पाईपलाईनची पाहणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्लास्टीक व्यवस्थापन करुन प्लॉस्टीकचा वापर कुठे करता येईल यासाठी नियोजन करण्यात यावे. महानगरपालिकेच्या व इतर शासकीय कार्यालयांमध्ये पाण्याची बचत व संवर्धनासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’प्रणालीच्या कामाचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला. शहरातील सर्व उपनद्यांना त्यांच्या नावाचे बोर्ड व फ्लुड सेन्सर लावण्याबाबतची कार्यवाही लवकर करण्यात यावी. रामकुंड पात्रावर प्रदूषण कमी करण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या आझोनायझेशनचा प्लांटच्या कामालाही गती द्यावी, अशा सूचना यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित व निशिंकात पगारे यांनी देखील चर्चेत सहभाग घेतला.