नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नदी संस्कृतीचे अस्तित्व जतन करणे तसेच धर्म,समाज व राष्ट्र कार्यात लोकसहभाग वाढविण्यास रामतीर्थ श्री गंगा गोदावरी आरती हा उपक्रम हाती घेणाऱ्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे दुसरा रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार विख्यात जलतज्ज्ञ पद्मश्री महेश शर्मा यांना जाहीर झाला आहे.7 फेब्रुवारीरोजी गोदा आरतीनंतर महा महिम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल,अशी माहिती समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी आणि स्वागत समितीचे श्रीनिवास लोया, धनंजय बेळे, सचिव मुकुंद खोचे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे दैनंदिन गोदा आरती तसेच वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.समितीतर्फे 2024 पासून गोदा जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.गेल्यावर्षी श्री राम मंदिराच्या उभारणीत भरीव योगदान देणारे थोर राष्ट्रीय संत गोविंदगिरी महाराज यांना पहिल्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.शाल,श्रीफळ सन्मानचिन्ह,मानपत्र आणि विशेष रकमेची थैली असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गोदावरी जन्मउत्सवाचे औचित्य साधून रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे विशेष सप्ताहाचे आयोजनही करण्यात आले आहे.त्यानुसार दि.२ फेब्रुवारीला ३ ते ६ या वेळेत खिमजी भगवान धर्मशाळा येथे गोदा स्वच्छता पर्यावरण परिसंवाद यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांची उपस्थिती असणार आहेत,5फेब्रुवारीला 151 वैदिकांच्या उपस्थितीत वेद पारायण,3 फेब्रुवारीला निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण तर 6 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ विजयाताई रहाटकर यांचा नासिक शहराच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन, 7 फेब्रुवारीला गोदा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल.
गोदावरी स्वच्छता, जनजागृती अभियानासह विविध उपक्रम राबवून रामतीर्थ गोदावरी समितीने नाशकात आपला आगळावेगळा ठसा उमटविला आहे. महाआरती फक्त नाशिक व महाराष्ट्रापुरतीच नव्हे तर संपूर्ण देशभरात अत्यंत प्रभावीपणे प्रचलित झाल्याचे गायधनी, खोचे, बेळे, लोया,यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेस चिराग पाटील, प्रफुल संचेती,राजेंद्र फड, शिवाजी बोन्दरडे,गुणवंत मणियार, विजय भातांब्रेकर,रामेश्वर मालाणी,नरेंद्र कुलकर्णी, आशिमा केला,,कल्पना लोया,कविता देवी,वैभव जोशी, विजय जोशी, आदी समिती सदस्य उपस्थित होते.
पद्मश्री महेश शर्मा यांचा परिचय
मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल झाबुआ जिल्ह्यातील रहिवासी असलेले पद्मश्री महेश शर्मा यांनी आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.जलतज्ज्ञ महेश शर्मा यांनी नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.जलव्यवस्थापनाद्वारे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यास कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान विकसित करून प्रशिक्षणाच्या माध्यमातून जैविक शेतीला प्रोत्साहन दिले. शिवगंगा संस्थेच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर लढा देत त्यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणले. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
राज्यपालांमुळे शोभा वाढणार
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीने या पुरस्कार सोहळ्याची शोभा वाढणार आहे.गोदावरी स्वच्छता अभियानासह विविध उपक्रम राबवून रामतीर्थ गोदावरी समितीने नाशकात आपला आगळावेगळा ठसा उमटविला आहे.गोदावरीतीरी होत असलेला हा गोदेच्या कुशीतील गोदावरी मातेच्या नावाने दिला जाणारा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार नाशिकरांसाठी संस्मरणीय राहील अशा पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.