कटिहार (बिहार) – बकरी चोरीच्या आरोपाखाली ग्रामस्थांनी दोन महिलांसह दोन तरुणांना पकडले आणि दोरीने बांधून त्यांना जोरदार मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यानंतर त्या दोन्ही पुरुष आणि महिलांचे डोक्यावरचे संपूर्ण केस काढून गावभर धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलासी पोलिस चौकीपासून काही अंतरावर बकरीच्या चोरीच्या आरोपाखाली ग्रामस्थांनी दोन महिला आणि दोन पुरुषांना पकडले आणि अमानुष अत्याचार केले. विशेष म्हणजे पोलिस चौकीजवळ असूनही मॉब लिंचिंगच्या या घटनेची माहितीही पोलिसांना नव्हती.
या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. आणि दोषींवर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या अमानुष घटनेत जमावाने दोन महिला आणि दोन तरुणांना बकरी चोर म्हणून केवळ मारहाणच केली नाही, तर त्यांना झाडाला बांधून महिलेच्या डोक्याचे केस कापले आणि डोक्यावर गाईचे शेण टाकले. तसेच, त्यांची नंतर धिंडही काढली. या घटनेनंतर स्थानिक परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
दोन्ही जखमी व पीडित महिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. घटनेत सामील झालेल्या सर्व संशयितांची ओळख पटली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.