पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोर्तुगिज तसेच बहामनी राजवटीत भारताचा देदीप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर, 1668 मध्ये आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिराची पुनर्बांधणी केली, ते गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर आज, 11 फेब्रुवारीपासून जीर्णोद्धारानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले होते आहे.
गोव्याचे ‘राज दैवत’ असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे आज लोकार्पण होते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. हा एक दुर्लभ योग आहे. महाराष्ट्र, गोवा आणि देशभरातील जनतेला यानिमित्ताने मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
यांनी केली नासधूस
बाराव्या शतकातील कदंब राजसत्तेच्या काळापासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व पुरातन वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेले गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर आज, ११ फेब्रुवारीपासून जीर्णोद्धारानंतर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. या मंदिराचा इतिहास विध्वंसकपणे पुसण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केला होता. त्याआधीही १३५५ मध्ये या मंदिराची बहामनी राज्यकर्त्यांनी नासधूस केली होती.
शिवाजी महाराजांकडून पुनर्बांधणी
छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६८ मध्ये मंदिराची पुनर्बांधणी केली. ३५० वर्षांनंतर म्हणजे २०१८ साली या श्रद्धास्थानाचा जीर्णोद्धार पूर्ण करण्यात आला आहे. मुंबईतील वास्तु विधान प्रोजेक्टसचे वास्तू सल्लागार श्री. राहुल चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धार झालेले हे मंदिर आहे. छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या सरदार घराण्यातील वंशजांच्या हस्ते विधिवत पूजार्चना करून भाविकांसाठी खुले होत असून हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा इतिहास यामुळे उजळला आहे. यामुळे गोव्याच्या धार्मिक वैभवात नक्कीच भर पडणार आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1624291235132477441?s=20&t=6-U8joNzZm5N3co4Jx2FPw
Goa Saptakoteshwar Temple Open for Devotees Today