पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समावेशकताविषयक ‘पर्पल फेस्ट: वैविध्याचा उत्सव साजरा करताना’ हा भारतात अशा प्रकारचा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला उत्सव आजपासून गोव्यात सुरु होत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार या उत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. जगातील प्रत्येकासाठी स्वागतशील आणि समावेशक विश्वाची निर्मिती करण्यासाठी आपण एकत्र येऊन कशा प्रकारे प्रयत्न करु शकतो याचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासंदर्भातील संवेदना जागृती चर्चासत्राला केंद्रीय मंत्री संबोधित करणार आहेत.
समावेशकतेची प्रेरणा आणखी प्रबळ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या पर्पल फेस्ट मध्ये विविध प्रकारची आकर्षक प्रत्यक्ष सादरीकरणे, क्रीडा स्पर्धा, महाप्रदर्शने, चित्रपटांचे सुलभतेने उपलब्ध सादरीकरण यांसह समावेशक शिक्षण, पर्यटन, रोजगार आणि स्वावलंबी जीवन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चात्मक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची आज सुरुवात होणार असून इतर मान्यवरांसह केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार देखील उपस्थित राहणार आहेत.
या उत्सवाचा एक भाग म्हणून, दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने सीसीपीडी अर्थात दिव्यांगांसाठी विहित मुख्य आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने गोवा येथे आज आणि उद्या या दोन दिवशी संवेदना जागृती चर्चासत्राचे आयोजन केले आहे.या चर्चासत्रात, दिव्यांग व्यक्तीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करत योजनांची पोहोच वाढवणे, अभिनव शोध आणि कृती योजना यांच्यावर लक्ष पुरवत दिव्यांगांशी संबंधित उत्तम प्रथा सादर केल्या जाणार आहेत. भारतभरातील सर्व संबंधित भागधारकांचा या चर्चासत्रात सहभाग अपेक्षित आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होणार असून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत या प्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील.
Goa Purple Fest What is it First time Arrange in India